कौटुंबिक अडचणींना धीराने सामोरे जाऊन गुरुचरणांशी स्थिर रहाणार्‍या खारघर, नवी मुंबई येथील सौ. शकुंतला मोहन बद्दी (वय ६२ वर्षे ) !

‘सौ. शकुंतला बद्दी या प्रारंभी समाजकार्य करत होत्या. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची महती त्यांच्या लक्षात आली. कुटुंबातील सर्वांचे आजारपण आणि अनेक अडचणी अन् यजमानांचा साधनेला असलेला विरोध या प्रसंगांना त्या धीराने सामोर्‍या गेल्या. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या प्रक्रियेच्या प्रयत्नात वाढ झाल्यावर त्यांना चुकांचे गांभीर्य लक्षात आले. त्यानंतर त्यांना स्वतःत पालट दिसू लागले आणि अनुभूतीही आल्या. साधना करतांना त्यांच्यातील प्रतिभा जागृत होऊन त्यांना अनेक काव्यरचना स्फुरल्या. त्यांच्यातील भावामुळे त्यांना सुचलेल्या काव्यरचना गुरुचरणी अर्पण करणार्‍या सौ. शकुंतला बद्दी यांचा साधनाप्रवास आपण जाणून घेऊया.                                        (भाग १)

सौ. शकुंतला बद्दी

१. साधनेत येण्यापूर्वी

‘मी महिला मंडळाच्या माध्यमातून समाजकार्य करत होते; मात्र त्यातून मला मिळणारा आनंद क्षणिक होता.

२. साधनेला आरंभ

‘वर्ष १९९७ पासून भगवंताच्या कृपेने मी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागले. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे साधकांना ईश्वरप्राप्ती करून देणारे प्रत्यक्ष भगवंतच आहेत’, याची मला प्रचीती आली. मला गुरुचरणांजवळ आल्यावर ‘आनंदाची खाणच मिळाली’, असे वाटते.

३. अनेक संकटे येऊनही साधनेमुळे स्थिर रहाता येणे

३ अ. यजमानांना कोलायटीस झाला असतांना ‘साधना सोडून द्यावी’, असा विचारही मनात न येणे आणि ‘आपण योग्य साधनामार्गात असून तिथेच प्रारब्धाचे भोग संपणार आहेत’, याची जाणीव होणे : वर्ष १९९७ ते २००२ पर्यंत माझ्या यजमानांना ‘अल्सरेटिव्ह कोलायटीस’(मोठ्या आतड्याचा दीर्घकालीन दाहक प्रकारचा आजार) हा अत्यंत त्रासदायक आजार झाला. माझी मुले लहान होती, तरी मला कसलीच भीती वाटली नाही. तेव्हा माझ्या मनात ‘सनातनविषयी कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. ‘ही साधना सोडून द्यावी’, हा विचारसुद्धा माझ्या मनाला शिवला नाही. ‘मी योग्य साधनामार्गात आले आहे, तिथेच माझ्या प्रारब्धाचे भोग संपणार आहेत’, याची मला जाणीव झाली.

३ आ. माझ्या मुलाचा अपघात झाला. त्याच्या पायाच्या बोटांचा अस्थीभंग झाला. तेव्हा मला त्याची ३ मास काळजी घ्यावी लागली.

३ इ. मला ३ वेळा हिवताप (मलेरिया) आणि विषमज्वर (टायफॉईड) झाला, तरी मी साधना करत असल्यामुळे माझे मन स्थिर होते.

४. यजमानांकडून साधनेला तीव्र विरोध असणे

४ अ. यजमानांचा साधनेला तीव्र विरोध असतांनाही गुरुचरणांशी रहाण्याचा निर्णय घेणे : माझे यजमान (श्री. मोहन बद्दी, वय ६७ वर्षे) नोकरीला जात असत. ते कार्यालयातून घरी येण्यापूर्वी मी सेवा करून घरी येत असे. यजमान वर्ष २०१५ मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर त्यांचा माझ्या साधनेला विरोध चालू झाला. ‘तू सनातनमध्ये गेल्यापासून घरात वाईट प्रसंग घडत आहेत’, असे म्हणून ते मला साधनेला विरोध करू लागले. हळूहळू त्यांचा विरोध पुष्कळ वाढला. एकदा ‘यजमान कि गुरु या दोघांपैकी एकाला निवडावे’, अशी माझी स्थिती झाली होती. त्या वेळी मी यजमानांना ‘मला गुरुचरणांशी जायचे आहे’, असे सांगितले. मला कुणी घरात ठेवा अथवा न ठेवा. मी मनातून गुरुचरणांशी जाण्याचा निर्णय घेतला होता.

– सौ. शकुंतला बद्दी, खारघर, नवी मुंबई (जुलै २०२४)              (क्रमश:)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक