‘मला मागील २० वर्षांपासून सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा सत्संग मिळत आहे. सद्गुरु राजेंद्रदादा मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांत अध्यात्मप्रसाराची सेवा करत होते. तेव्हा मी अध्यात्मप्रसाराची आणि हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत सेवा करत असतांना आमचा संपर्क यायचा. अनुमाने मागील १४ वर्षांपासून आम्ही दोघेही देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात निवासाला असल्यामुळे एकमेकांच्या सतत संपर्कात असतो.
भाद्रपद शुक्ल षष्ठी (९.९.२०२४) या दिवशी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा ६२ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त माझ्या अल्प मतीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात होत असलेले पालट मी कृतज्ञताभावाने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण करतो.
१. उत्साही आणि प्रसन्न
सद्गुरु राजेंद्रदादांना काही व्याधीमुळे तीव्र वेदना होत असतात, तरीही ते नेहमी उत्साही आणि प्रसन्न असतात. ‘त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपणही उत्साहाने साधना करावी’, अशी स्फूर्ती मला मिळते.
२. जवळीक साधणे
सद्गुरु दादा सर्वांशी सहजतेने बोलतात. त्यांची समाजातील व्यक्ती, साधक आणि संत यांच्याशी लगेच जवळीक होते. साधक त्यांना स्वतःच्या अडचणी सांगू शकतात. साधकांना सद्गुरु दादांचा आधार वाटतो.
३. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
अ. सद्गुरु दादा ‘सद्गुरु’ असले, तरी ते साधनेचे निरंतर प्रयत्न करतात. एकदा त्यांनी सांगितले, ‘‘या आठवड्यात माझी सूचनासत्रे अल्प झाली.’’
आ. ते नामस्मरण वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करतात.
इ. सद्गुरु दादांनी अनावश्यक न बोलण्यासाठी प्रयत्न करून त्यावर नियंत्रण मिळवले आहे.
४. ‘संतांची प्रत्येक कृती ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’, म्हणजेच गुरुदेवांना अपेक्षित अशी असली पाहिजे’, हे सद्गुरु दादा स्वतःच्या आचरणातून शिकवतात.
५. चुकांप्रती संवेदनशील असणे
अ. सद्गुरु दादा स्वतःच्या चुका प्रांजळपणे स्वीकारून क्षमा मागतात. ते स्वतःचे निरीक्षण करून स्वतःकडून झालेल्या चुका संतांच्या सत्संगात सांगतात.
आ. सद्गुरु दादा मला एक सूत्र सांगण्यासाठी माझ्या खोलीत आले होते. तेव्हा ते माझ्याशी मोठ्याने बोलत होते. त्या वेळी माझ्या खोलीतील दुसरे एक संत नामजप करत होते. त्या संतांनी सद्गुरु दादांना ‘मी नामजप करत आहे. मोठ्याने बोलू नका’, असे सांगितले. तेव्हा सद्गुरु दादांनी स्वतःचे कान धरून त्या संतांची क्षमा मागितली आणि संतांच्या सत्संगातही ही चूक सांगितली.
इ. एकदा ते कपडे विकत घेण्यासाठी मुंबईला गेले होते. ‘नामजप करण्याचे ठरवून मी तसा प्रयत्न करत होतो; पण कपडे पहातांना बराच वेळ माझा नामजप बंद पडला’, अशी स्वतःची चूक त्यांनी प्रांजळपणे सांगितली.
६. सद्गुरु दादा सनातनचे ग्रंथ आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांचा अभ्यास करतात अन् त्यांतून शिकण्याचा प्रयत्न करतात.
७. साधकांना नामजपादी उपाय तळमळीने आणि तत्परतेने सांगणे
सद्गुरु दादा साधकांना त्यांच्या त्रासावर नामजपादी उपाय सांगतात. ‘ही सेवा देवाने दिली आहे आणि देवच माझ्याकडून ती सेवा करून घेणार आहे’, अशी सद्गुरु दादांची श्रद्धा आहे. त्यांनी सांगितलेल्या नामजपाचा साधकांना लाभ होत आहे. सद्गुरु दादांना आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांचा कोणत्याही वेळी भ्रमणभाष येतो. तेव्हा सद्गुरु दादा त्वरित स्वतःची कृती थांबवून साधकांना नामजपादी उपाय सांगतात; कारण त्या क्षणी साधकांना होणार्या त्रासाची जाणीव सद्गुरु दादांना असते.
८. नेतृत्वगुण
अ. संतांकडे नामजपादी उपाय करण्याची समष्टी सेवा असते. या सेवेत अनिष्ट शक्ती अडथळे आणत असतात; परंतु ही सेवा समयमर्यादेत, परिपूर्ण आणि भावपूर्ण करायची असते. सद्गुरु दादा ही सेवा आणि तिचा समन्वय पुढाकार घेऊन अत्यंत उत्तम रितीने करतात.
आ. ते साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेत असतांनाही नेतृत्वगुण वाढवण्यासाठी साधकांकडून प्रयत्न करून घेत आहेत.
९. सद्गुरु दादा ‘नामस्मरण करतांना भाव कसा ठेवायचा ? मानस मुद्रा कशी करायची ?’, हे सर्वांना शिकवतात.
१०. सद्गुरु दादांचा समाजातील व्यक्ती, अनेक साधक आणि संत यांच्याशी संपर्क येतो, तसेच अनेक जण त्यांच्याकडून साधनेविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांना संपर्क करतात.
११. ‘स्वतःला जे चांगले शिकायला मिळाले, ते समष्टीला सांगावे’, अशी सद्गुरु दादांची तळमळ असते.
१२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आज्ञापालन म्हणून सद्गुरु दादांनी समष्टीसाठी लिखाण केले आहे. ते कोणत्याही गोष्टीचा कर्तेपणा घेत नाहीत.
१३. गुरूंप्रतीचा भाव
सद्गुरु दादांचा सनातनच्या तिन्ही गुरूंप्रती (टीप) भाव आहे. सद्गुरु दादांनी स्वतःला गुरुकार्यासाठी वाहून घेतले आहे. ‘जे झाले, जे होत आहे आणि जे होणार आहे, ती सर्व माझ्या गुरूंची कृपा आहे’, असा त्यांचा भाव आहे.
टीप – तीन गुरु : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ.
१४. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्यात जाणवलेले पालट
१४ अ. साधकांना साधनेत निरपेक्षतेने साहाय्य करणे : व्यष्टी साधनेच्या आढाव्यातील साधक आणि संपर्कात येणार्या व्यक्ती यांचे निरीक्षण करून ते त्यांना साधनेत साहाय्य म्हणून त्यांच्यातील उणिवा सांगतात. आता ते साधकांकडून अपेक्षा न करता त्यांना साधनेत साहाय्य करतात.
१४ आ. क्षमाशीलतेत वाढ झाल्याचे जाणवणे : सद्गुरु दादांमधील ‘क्षमाशीलता’ हा गुण वाढत आहे. ते साधकांना स्थिर राहून आणि शांतपणे चुका सांगतात. पूर्वी साधकांना स्वतःची चूक झाल्यावर सद्गुरु दादांची भीती वाटून ताण यायचा; पण आता साधक चुकांतून शिकून सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. यावरून ‘सद्गुरु दादा साधकांना क्षमा करत आहेत आणि साधकांशी पुष्कळ जवळीक साधत आहेत’, असे मला वाटते.
१४ इ. चैतन्यात वाढ होत असल्याचे जाणवणे : सद्गुरु दादांच्या चैतन्यमय वाणीमुळे साधकांच्या अंतर्मनाचा वेध घेतला जातो आणि साधक स्वयंप्रेरणेने त्यांचे आज्ञापालन करतात. ‘सद्गुरु दादांमधील चैतन्य पुष्कळ वाढत असून परात्पर गुरु डॉ. आठवले सद्गुरु दादांकडून चैतन्याच्या स्तरावर कार्य करून घेत आहेत’, असे मला वाटते.
‘अध्यात्म, साधना आणि गुरुकार्य यांसाठीच माझे जीवन आहे’, अशी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची धारणा आहे. ‘सद्गुरु दादांचा मला अनमोल सत्संग लाभत आहे. मला साधना आणि सेवा यांमध्ये त्यांचे साहाय्य लाभत आहे अन् त्यांच्याकडून मला पुष्कळ शिकता येत आहे’, याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.८.२०२४)