US Return 297 Antiquities : अमेरिकेने परत केल्‍या २९७ प्राचीन भारतीय वस्‍तू

पंतप्रधान मोदी यांचा अमेरिका दौरा

अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

वॉशिंग्‍टन (अमेरिका) – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्‍या अमेरिका दौर्‍यावर आहेत. अमेरिकेने भारतीय संस्‍कृतीशी संबंधित २९७ प्राचीन वस्‍तू परत केल्‍या आहेत. या वस्‍तू भारतातून तस्‍करीच्‍या माध्‍यमातून बाहेर गेल्‍या होत्‍या. मोदी पंतप्रदान झाल्‍यापासून आतापर्यंत भारताने ६४० प्राचीन वस्‍तू परत मिळवल्‍या आहेत.

वर्ष २०२१ मध्‍ये जेव्‍हा पंतप्रधान मोदी अमेरिकेला गेले होते, तेव्‍हा त्‍यांना १५७ वस्‍तू परत करण्‍यात आल्‍या होत्‍या. त्‍यांत १२ व्‍या शतकातील नटराज मूर्तीचाही समावेश होता. यानंतर वर्ष २०२३ मध्‍ये पंतप्रधान मोदी यांच्‍या दौर्‍यानंतर अमेरिकेने १०५ वस्‍तू भारताला परत केल्‍या. अशा प्रकारे आतापर्यंत एकट्या अमेरिकेकडून ५५९ प्राचीन आणि मौल्‍यवान वस्‍तू परत करण्‍यात आल्‍या आहेत. अमेरिकेखेरीज ब्रिटनमधून १६ आणि ऑस्‍ट्रेलियातून १४ कलाकृती परत करण्‍यात आल्‍या आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी एक्‍सवर पोस्‍ट करत या प्रकरणी अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन यांचे आभार मानले आहेत. तस्‍करीविरुद्धचा लढा अधिक तीव्र होत असल्‍याचेही ते म्‍हणाले.

संपादकीय भूमिका

भारतातील प्राचीन मूर्ती आणि वस्‍तू यांची तस्‍करी होऊन त्‍या देशाबाहेर जातातच कशा ? पुरातत्‍व विभाग झोपला आहे का ? या प्राचीन वस्‍तूंचे जतन करू न शकणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करा !