अमरावती येथे राम इंडस्ट्रिजला लागली आग !
अमरावती – बडनेरा मिनी बायपास मार्गावरील एम्.आय.डी.सी. परिसरात राम इंडस्ट्रिज या खाद्यतेल आस्थापनाच्या कारखान्याला १८ सप्टेंबरला सकाळी भीषण आग लागली. आगीमुळे आकाशात मोठे धुराचे लोट दिसत होते. या घटनेची माहिती अग्नीशमनदलाला देण्यात आल्यानंतर अमरावती महापालिकेचे अग्नीशमनदलाच्या कर्मचार्यांनी आगीवर ताबा मिळवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अकोला येथे खासगी बसचा अपघात !
अकोला – पुण्याहून अकोला येथे येणार्या इंदुमती ट्रॅव्हल्सच्या चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. या अपघातात बसमधील १ प्रवासी जागीच ठार झाला. तर चालकासह १ जण घायाळ झाले. ही घटना १७ सप्टेंबरला सकाळी ७.३० पारसफाटा येथे घडली.
नाशिक येथे संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या !
नाशिक – येथील पाथर्डी फाट्यावरील सराफनगरमध्ये आई, वडील आणि मुलगी यांनी आत्महत्या केली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विजय माणिक सहाणे (वय ३८ वर्षे), ज्ञानेश्वरी विजय सहाणे (वय २९ वर्षे) आणि अनन्य विजय सहाणे (वय ९ वर्षे) अशी कुटुंबियांची नावे आहेत. आस्थापनामधून विजय सहाणे यांना त्रास होत असल्याने त्यांनी जीवन संपवल्याचा आरोप अन्य नातेवाइकांनी केला आहे.
ऑनलाईन नोंदणीनंतर ‘ओटीपी’ सांगणे बंधनकारक !
एल्.पी.जी. आस्थापनाची नवी कार्यप्रणाली !
वर्धा – एल्.पी.जी. आस्थापनाद्वारे ग्राहकांना ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर भ्रमणभाषवर येणारा ओटीपी सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे घरी सिलेंडर घेऊन कर्मचारी येईल, तेव्हा ‘ओटीपी’ सांगावा लागेल, तरच गॅस सिलेंडर मिळेल. आपण ज्या भ्रमणभाषवरून सिलेंंडरची नोंदणी केली आहे आणि तो मोबाईलधारक घरी नसेल, तर घरच्यांची तारांबळ उडू शकते. त्यासाठी आधीच गॅसची नोंदणी निश्चित झाल्याचा संदेश घरातील इतरांनाही पाठवून ठेवावा लागणार आहे.