रायपूर (छत्तीसगड) : महासमुंद येथे ‘वन्दे भारत एक्सप्रेस’वर दगडफेक करण्यात आली आहे. बागबहरा रेल्वे स्थानकाजवळ ही दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत ३ डब्यांच्या काचा फुटल्या. याविषयीची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी ५ जणांना अटक केली. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना रेल्वे न्यायालयासमोर उपस्थित करण्यात येणार आहे.
रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी परवीन सिंह यांनी सांगितले की, महासमुंद येथून निघालेली ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ ९ वाजण्याच्या सुमारास बागबहराजवळ पोचली असता काही समाजकंटकांनी त्याच्यावर दगडफेक केली. याविषयीची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना अटक केली.
याआधीही ‘वन्दे भारत’ एक्सप्रेसवर झाली होती दगडफेक !
१. ‘वन्दे भारत एक्सप्रेस’वर दगडफेक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक शहरांमध्ये या गाडीवर दगडफेक झाली आहे. काही दिवसांपूर्वी लक्ष्मणपुरीहून पाटलीपुत्राकडे जाणार्या ‘वन्दे भारत’वर समाजकंटकांनी दगडफेक केली होती.
२. जुलै २०२४ मध्ये गोरखपूरहून लक्ष्मणपुरीला जाणार्या ‘वन्दे भारत’वर समाजकंटकांनी दगडफेक केली होती.
३. यापूर्वी गुजरात, बंगाल, बिहार, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू यांसह अनेक राज्यांमध्ये ‘वन्दे भारत’वर दगडफेक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
संपादकीय भूमिकाराष्ट्रीय संपत्तीची हानी करणार्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने कठोर कायदा केला पाहिजे ! |