‘मी मागील १० वर्षे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहे. याविषयी माझे काही नातेवाईक नापसंती व्यक्त करतात आणि ते मला ‘तू लग्न किंवा नोकरी कर’, असे सांगतात. माझी मावशी सौ. आरती साठे (वय ६० वर्षे) मला साधनेविषयी कधीच नकारात्मक बोलली नाही. उलट तिने मला साधना करायला प्रोत्साहन दिले.
डिसेंबर २०२३ मध्ये माझ्या आजीच्या ९० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व नातेवाइकांना बोलावले होते; म्हणून मी मावशीसह माझ्या आजोळी बडोद्याला गेले होते. तेव्हा मावशी मला म्हणाली, ‘‘आज आजीचा वाढदिवस आहे. त्या वेळी मला तुझाही सत्कार करायचा आहे. ‘आमच्या कुटुंबातील एक मुलगी लग्न न करता आश्रमात राहून साधना करत आहे’, याचे मला कौतुक वाटते.’’ त्या दिवशी माझी मावशी आणि अन्य नातेवाईक यांनी मला ओवाळले. तेव्हा मावशी म्हणाली, ‘‘तू आश्रमात रहातेस ना; म्हणून तू माझ्यासाठी देवीस्वरूप आहेस.’’ नंतर तिने माझी ओटी भरली.
मावशी सर्व नातेवाइकांना म्हणाली, ‘‘आपल्या गप्पा होतच असतात; पण आपला सगळा वेळ गप्पांमध्ये जाऊ नये; म्हणून आपण आध्यात्मिक प्रश्नमंजुषा घेऊया.’’ तेव्हा ‘आलेल्या नातेवाइकांना आध्यात्मिकदृष्ट्या काहीतरी लाभ व्हावा’, असा मावशीचा विचार होता. त्यानुसार मी प्रश्नमंजुषा सिद्ध केली. याविषयी काही नातेवाइकांनी सांगितले, ‘‘ही संकल्पना पुष्कळ चांगली आहे.’’
पूर्णवेळ साधना करणार्या साधकांना टोचून बोलणारे नातेवाईक मी बघितले आहेत; पण ‘एका पूर्णवेळ साधिकेप्रती आदर आणि भाव असणारी माझी मावशी हे एक दुर्मिळ उदाहरण आहे’, असे मला वाटते.
‘परात्पर गुरु डॉक्टर, ‘आपल्या कृपेने मला साधना करण्यासाठी प्रोत्साहन देणारी मावशी मिळाली’, याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. सुप्रिया सतीश जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.२.२०२४)