सांगली – ‘सहस्रो वर्षांपासून भारतावर आक्रमणे होऊनही कुणाला हिंदु धर्म संपवता आला नाही’, या खुळचट कल्पनेत हिंदूंनी कायम राहू नये. आज हिंदूंना संपवण्यासाठी जाती-जातींमध्ये विष पेरले जात आहे. आपण यापासून दूर राहून सनातनी संस्कृती टिकवायला हवी, असे मत प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. सांगलीतील ‘श्री गणपति पंचायतन संस्थान न्यासा’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘भारत – काल, आज आणि उद्या’ या विषयावर ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘ज्या क्षणी आपण ४९ टक्क्यांवर आलो, त्या क्षणी आपला देश संपेल; पण घाबरू नका, हे काही शक्य नाही. निसर्गाने ज्याला बनवले आहे, त्याला कुणी संपवू शकत नाही; परंतु ‘अखंड सावध असावे’, असे समर्थ म्हणतात. इतरांना त्यांच्या हक्काची अनेक राष्ट्रे आहेत. हिंदु धर्मासाठी मात्र भारत हा एकच देश आहे. हिंदूंना येथून हाकलले, तर आश्रय घ्यायला दुसरे राष्ट्र नाही. भारताला हिंदु राष्ट्र कायम ठेवायचे असेल, तर आगामी काळात योगी आदित्यनाथ यांच्याकडे देशाची सत्ता असावी.’’