राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण
मालवण – तालुक्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद असलेले मूर्तीकार जयदीप आपटे आणि बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना येथील न्यायालयात उपस्थित करण्यात आले. या वेळी न्यायालयाने जयदीप आपटे यांना १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, तर डॉ. पाटील यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. डॉ. चेतन पाटील यांना सावंतवाडी येथील कारागृहात ठेवण्यात येणार आहे.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्ट या दिवशी घडली होती. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे, तांत्रिक सल्लागार चेतन पाटील या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या दोघांना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्याने या दोघांनाही येथील न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते.
मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे यांची अजून चौकशी करायची असल्याने ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयात करण्यात आली होती.