मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मुंबई येथील सेवाकेंद्रात सेवेसाठी जात असे. त्या वेळी त्यांच्या आई पू. (कै.) श्रीमती नलिनी आठवले याही तेथे होत्या. मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
१. काटकसरी
‘पू. ताई (गुरुदेवांच्या मातोश्री पू. नलिनी आठवले) त्यांच्या खोलीतील देवतांच्या चित्रांना फुलांचा हार घालत असत. त्या दुसर्या दिवशी हारातील दोरा वेगळा करून नीट गुंडाळून ठेवत आणि फुले कुंडीतील झाडांना खत म्हणून घालत असत.
ज्या ‘प्लॅस्टिक’च्या पिशव्यांतून साहित्य घरी येत असे, त्या पिशव्या पू. ताई व्यवस्थित घडी घालून पुन्हा वापरण्यासाठी ठेवत असत. त्या पातळ पिशव्या आणि अन्य पिशव्या वेगवेगळ्या ठेवत असत.
२. राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान
त्यांना राष्ट्र आणि धर्म यांच्याप्रती अभिमान होता. त्या आम्हाला सांगत, ‘‘चित्रपट पहायचा असल्यास स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील चित्रपट पहावा.’’
३. इतरांचा विचार करणे
पू. ताई स्वयंपाकघरात सेवा करणार्या जया (आताच्या सौ. जया साळोखे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४२ वर्षे)) आणि सुश्री (कु.) महानंदा पाटील (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५६ वर्षे) यांना भाजी आणि धान्य निवडून देत असत. त्या आठवड्यातील एक दिवस सेवाकेंद्रातील साधकांना सकाळच्या प्रसादासाठी भाताची कण्हेरी (टीप) करून देत असत.
(टीप – कण्हेरी : तांदूळ धुवून ते वाळवायचे. नंतर ते तांदूळ जाडसर दळून आणायचे. ते भाजून त्याच्या ४ पट पाणी घालून शिजवायचे.)
४. प्रीती
पू. ताई मुंबई सेवाकेंद्रातील साधकांवर पुष्कळ प्रेम करत असत. एकदा त्यांना दम्याचा त्रास होत असतांना त्यांना प्राणवायू देण्यात येत होता. अशा स्थितीत त्या बसून होत्या. त्या वेळी मला त्यांची काळजी वाटू लागली. तेव्हा मी त्यांच्या मांडीवर डोके ठेवले असतांना त्या मला कुरवाळत होत्या. ‘त्यांना इतका त्रास होत असूनही त्या माझ्यावर प्रेम करत आहेत’, हे पाहूनच मला भरून आले.
५. मी पू. ताईंशी मनमोकळेपणाने बोलत असे. त्यांच्याजवळ बसल्यावर मला ऊर्जा मिळत असे.’
– श्री. सागर म्हात्रे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४२ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.(२५.३.२०२४)