Sardar Akhtar Mengal of Pakistan : बलुचिस्तान प्रांत पाकच्या हातातून गेला आहे !

बलुचिस्तानच्या स्थितीवरून एका पाकिस्तानी खासदाराचे त्यागपत्र देतांनाचे वक्तव्य !

सरदार अख्तर मेंगाल

इस्लामाबाद (पाकिस्तान) – बलुचिस्तानची स्थिती पाहून पाकिस्तानच्या सरदार अख्तर मेंगाल नावाच्या खासदाराने संसदेत खासदारकीचे त्यागपत्र दिले. ‘बलुचिस्तान नॅशनल पार्टी-मेंगल’ असे त्यांच्या पक्षाचे नाव असून ते पक्षाचे प्रमुख आहेत. बलुचिस्तान या अशांत प्रांताकडे पाकिस्तानी संसद सातत्याने दुर्लक्ष करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

६ महिन्यांपूर्वी झालेल्या संसदेच्या निवडणुकांच्या वेळी ६१ वर्षीय मेंगल हे खुजदार या त्यांच्या मूळ मतदारसंघातून निवडून आले होते. बलुचिस्तानमध्ये अलीकडील आक्रमणे आणि गेल्या काही महिन्यांत अनेक जण बेपत्ता झाल्यावरून वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी त्यागपत्र दिले. तथापि त्यांचे त्यागपत्र अद्याप स्वीकारण्यात आलेले नाही.

मेंगाल पुढे म्हणाले,

१. आज मी संसदेमध्ये बलुचिस्तानच्या समस्येवर बोलण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु त्यात कुणालाही रस नाही.

२. बलुचिस्तान हातातून निसटण्याच्या मार्गावर नाही, तर आधीच हाताबाहेर गेला आहे.

३. बलुचिस्तानमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या प्रश्‍नावर सर्वांनी एकजूट दाखवली पाहिजे.

४. जेव्हा हे सूत्र उपस्थित केले जाते, तेव्हा ते दाबण्यात येते. तुम्हाला माझे शब्द चुकीचे वाटत असतील, तर मी कोणतीही शिक्षा स्वीकारतो.

५. तुम्हाला संसदेबाहेर मला मारायचे असेल, तर मारा; पण निदान माझे ऐका. आमचे कुणीही नाही आणि आमचे कुणी ऐकत नाही.

संपादकीय भूमिका

पाक बलुची लोकांवर गेली ७५ वर्षे अत्याचार करत आहे. त्यामुळे जसे पूर्व बंगालचा बांगलादेश करण्यात भारताने साहाय्य केले, तसे आता बलुचिस्तानसाठी भारताने पावले उचलावीत, असे अनेक बलुची नेत्यांना वाटते ! एका खासदाराने त्यागपत्र दिल्यावरून बलुचिस्तानमधील दुरवस्थेची तीव्रता लक्षात येते !