दहीहंडी उत्सवाची विटंबना !

नृत्यांगना गौतमी पाटील ही शिवसेना नेते प्रकाश सुर्वे यांच्या मागाठाणे येथील दहीहंडीला उपस्थित होती. राधा-कृष्णाचे चित्र असलेला पिवळ्या रंगाचा ब्लाऊज तिने परिधान केला होता. ‘कचकच कांदा..’, ‘पाव्हणं जेवला काय’ यांसारख्या गाण्यावर अश्लील हावभाव करत तिने नृत्य केले. सध्याच्या एकाही दहीहंडी कार्यक्रमात भावभक्ती नसते, धर्मजागरण नसते, समाजप्रबोधन नसते. श्रीकृष्ण, श्रीराम, भारतमाता, सनातन धर्म यांचा जयघोष नसतो. मोठ्या प्रमाणात युवा वर्ग असलेल्या या दहीहंडीच्या कार्यक्रमात कानठळ्या बसवणार्‍या संगीतावर लावणी, अश्लील, बीभत्स किंवा विकृत नाच दाखवत या उत्सवाला विकृत करण्यात आले आहे. दहीहंडीच्या नावाखाली स्त्रियांचे हिडीस आणि अश्लील नाच आयोजित करणार्‍या अन् स्त्रीदेहाचा बाजार मांडणार्‍या आयोजकांविरोधात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी खरेतर गुन्हा नोंद व्हायला हवा. उत्सवाचे हे स्वरूप पाहून या सध्या देशात आणि राज्यात स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे, असे कुणाला वाटेल का ?

खरेतर हा कृष्ण जन्मोत्सव असतो. या उत्सवाला सध्या एवढे हिडीस स्वरूप आले आहे. लाखो रुपयांची बिदागी घेऊन असल्या गाण्यावर नाचणार्‍या कलाकारांनाही याचे भान नसते आणि आयोजकांनाही नसते. मुळात हिंदूंचे सण भावभक्ती वाढवण्यासाठी आहेत, हेच ज्ञान नसल्यामुळे तशी कृती होत नाही. निदान सणाचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन तरी अश्लील नृत्ये का टाळली जात नाहीत ? दहीहंडी बघायला आलेल्या एकाही हिंदूला यात काहीच चुकीचे वाटत नाही, हेच मोठे दुर्दैव आहे. अन्य धर्मियांच्या सणांत अशी विकृती दिसत नाही; मग हिंदूंनीच धर्माचरण का सोडले आहे ? हिंदूंच्या सणातील पावित्र्य जणू हद्दपार झाले आहे. ते आता पैसे कमवून देणारे ‘इव्हेंट’ (कार्यक्रम) झाले आहेत. दहीहंडी हा बालगोपालांचा उत्सव आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांना चांगले दही, लोणी खायला मिळावे म्हणून मडकी फोडून सगळे मिळून खात असत. श्रीकृष्णाला अनुभवत हा सण साजरा केला, तर त्यातून खरेतर श्रीकृष्ण तत्त्व अनुभवता येऊ शकते; परंतु सध्या या दहीहंडीकडे आता एक ‘साहसी खेळ’ म्हणून पाहिले जात आहे. अनेक सार्वजनिक मंडळाचे तरुण बक्षिसांच्या हंड्या फोडण्यासाठी चढाओढ करत असतात. राजकीय नेते स्वतःचे शक्तीप्रदर्शन दाखवण्यासाठी या धार्मिक कार्यक्रमात नाचण्यासाठी अश्लील नृत्यांगना, अभिनेत्री यांना बोलावतात, हेही खेदजनक आहे. स्पर्धा, जीवघेणा थरार, महिलांची दहीहंडी, १२ थरांपर्यंत मनोरे, कानठळ्या बसवणारे संगीत असे बीभत्स स्वरूप टाळून उत्सव भक्तीभावाने करण्याचा प्रयत्न झाला, तर श्रीकृष्णाची कृपा अनुभवता येईल !

–  सौ. अपर्णा जगताप, पुणे.