१८ सहस्र लोकांना सुरक्षित स्थळी हालवले
कर्णावती (गुजरात) – गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडणार्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांत पूर आला आहे. गेल्या ३ दिवसांत पाऊस आणि पूर यांमुळे २६ जणांचा मृत्यू झाला आहे. पूरग्रस्त भागांतून १८ सहस्र लोकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले आहे.
१. गुजरात सरकारने दिलेल्या माहितीनुसार मोरबी, वडोदरा, भरूच, जामनगर, अरवली, पंचमहल, द्वारका आणि डांग या जिल्ह्यात प्रत्येकी एका नागरिकाचा मृत्यू झाला. आनंद जिल्ह्यात ६, कर्णावतीमध्ये ४ आणि गांधीनगर, खेडा, महीसागर, दाहोड आणि सुरेंद्रनगर जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी २ जणांचा मृत्यू झाला आहे. वडोदर्याला (बडोद्याला) पुराचा सर्वाधिक फटका बसला असून शहरातील काही भागांत १० ते १२ फुटांपर्यंत पाणी साचले आहे. पुरातून वाचण्यासाठी अनेक भागांत लोकांनी घराच्या छतावर आसरा घेतला आहे. वडोदरा येथील सहस्रो नागरिकांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाकडून सुरक्षित स्थळी हालवण्यात आले आहे. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचीही अनेक पथके ठिकठिकाणी साहाय्यता कार्य करत आहेत. काही ठिकाणी सैन्यालाही पाचारण करण्यात आले आहे.
२. गुजरात सरकारच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील १४० जलाशय पूर्ण भरली असून २४ नद्या दुथडी भरून वहात आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या परिसराला धोक्याची चेतावणी देण्यात आली आहे. राज्यातील २०६ धरणांपैकी १२२ धरणांच्या परिसराला अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी यांचे राज्याला साहाय्याचे आश्वासन
गुजरातच्या काही भागांत अन्नधान्याची टंचाई भासत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरभाषवरून संवाद साधत राज्यातील अन्यधान्याच्या साठ्याची माहिती घेतली. तसेच या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण शक्तीनिशी गुजरातच्या पाठीशी आहे, असे आश्वासनही पंतप्रधान मोदी यांनी दिले.