४ सप्टेंबरपासून ओझर येथे ‘श्रीं’चा जन्मोत्सव सोहळा ! – बाळासाहेब कवडे, अध्यक्ष, श्री विघ्नहर गणपति देवस्थान ट्रस्ट’

ओझर (जिल्हा पुणे) – ओझरचे देवस्थान हे अष्टविनायकांपैकी नवसाला पावणारे म्हणून प्रसिद्ध असून प्रतिवर्षीप्रमाणे श्रीक्षेत्र ओझर येथील मंदिरात महान साधू श्री मोरया गोसावी यांच्या संप्रदायाप्रमाणे भाद्रपद शुक्ल प्रतिपदा म्हणजेच ४ सप्टेंबरपासून प्रारंभ होत असून तो भाद्रपद शुक्ल पंचमी, म्हणजेच ८ सप्टेंबरअखेर साजरा होणार आहे. तरी या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून त्याचा अधिकाधिक भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ओझर येथील ‘श्री विघ्नहर गणपति देवस्थान ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. बाळासाहेब चिंतामण कवडे, विश्वस्त आणि ग्रामस्थ यांनी केले आहे.

‘श्री विघ्नहर गणपति देवस्थान ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. बाळासाहेब कवडे

या सोहळ्यात ४, ५ आणि ६ सप्टेंबरला प्रतिदिन सकाळी ९.३० वाजता पालखी सोहळा प्रारंभ होईल. ७ सप्टेंबरला सकाळी ९ ते ११.३० या वेळेत पालखी सोहळा, सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० श्री गणेश जन्मकाळ सोहळा कीर्तन, दुपारी १२.३० ते १ श्रींचा जन्मोत्सव सोहळा, दुपारी ३ ते सायंकाळी ६ सामुदायिक शेरण्या आणि दंडवते, रात्री ९ ते ११ कीर्तन, तर रात्री १२ नंतर छबीना, भजन, जागर होईल. ८ सप्टेंबर या दिवशी सकाळी ९ ते १२ या वेळेत पालखी मिरवणूक सांगता सोहळा होईल. ४ ते ७ सप्टेंबर या कालावधीत प्रतिदिन रात्री ११ ते १२ वाजता धुपारती आणि मोरया गोसावी यांची पदे, छबीना होईल. याच समवेत ८ सप्टेंबरला दुपारी ३ ते रात्री ७ या वेळेत लाल मातीतील भव्य कुस्त्यांचा जंगी आखाडा होईल.

श्री गणेशाच्या आशीर्वादाने विविध प्रकल्प पूर्णात्वास नेण्यासाठी प्रयत्नशील ! – बाळासाहेब कवडे

‘श्री विघ्नहर गणपति देवस्थान ट्रस्ट’च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हा पहिलाच ‘श्रीं’चा जन्मोत्सव आहे. माझे सर्व विश्वस्त, गावकरी यांच्या सहकार्याने श्री गणेशाच्या आशीर्वादाने विविध प्रकल्प पूर्णात्वास नेण्यासाठी प्रयत्नशील राहू. यात प्रामुख्याने रुग्णालये, तसेच भाविकांना अन्य सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ‘पैसा हे सर्वस्व नसून माणसे कमवणे, श्री गणेशाची-भाविकांची सेवा करणे’, हेच उद्दिष्ट समोर ठेवून आम्ही सर्वजण कार्यरत आहोत.

‘श्री विघ्नहर गणपति देवस्थान ट्रस्ट’ची कार्यक्रम पत्रिका