वाहनांच्‍या ‘हेडलाईट’मध्‍ये नियमबाह्य पालट करणार्‍यांवर कारवाई करावी ! – महाराष्‍ट्र परिवहन आयुक्तांचा आदेश

  • ‘सुराज्‍य अभियाना’च्‍या तक्रारीचा परिणाम ! 

  • महाराष्‍ट्रातील सर्व परिवहन अधिकार्‍यांना आदेश !

  • कार्यवाही न झाल्‍यास न्‍यायालयात जाण्‍याची सुराज्‍य अभियानाची चेतावणी

मुंबई – वाहनांच्‍या ‘हेडलाईट’चे (समोरील दिव्‍यांचे) प्रकाशकिरण कसे असावे ? याविषयी ‘केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९’ अंतर्गत मानके निश्‍चित करण्‍यात आली आहेत; मात्र याला डावलून काही वाहनचालक गाड्यांच्‍या हेडलाईटमध्‍ये डोळ्‍यांना त्रासदायक होतील अशा पद्धतीने दिवे बसवतात. त्‍यामधील त्रासदायक प्रकाशकिरणांमुळे राज्‍यात अपघाताच्‍या अनेक घटना घडल्‍या आहेत. काही जणांना स्‍वत:चा प्राणही गमवावा लागला.

‘सुराज्‍य अभियाना’ने याचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्‍याच्‍या परिवहन आयुक्‍तांकडे तक्रार केली होती. याची नोंद घेऊन २३ ऑगस्‍ट या दिवशी परिवहन आयुक्‍तांनी या प्रकरणी कारवाई करून अहवाल सादर करण्‍याचा आदेश राज्‍यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना दिला आहे, तसेच हेडलाईटमध्‍ये नियमबाह्य पालट करणार्‍या वाहनांची पडताळणी करून दोषी वाहनचालकांवर कारवाई करावी, तसेच याविषयी जनजागृती करावी, असेही परिवहन आयुक्‍तांनी परिपत्रकाद्वारे राज्‍यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक अधिकार्‍यांना कळवले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीच्‍या ‘सुराज्‍य अभियाना’चे महाराष्‍ट्र राज्‍य समन्‍वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी दिली आहे.

‘सुराज्‍य अभियाना’चे प्रसिद्धीपत्रक –

श्री. अभिषेक मुरुकटे, समन्वयक, सुराज्य अभियान

१. वाहन चालवतांना चालकाचे डोळे समोरील वाहनाच्‍या हेडलाईटच्‍या प्रकाशकिरणांमुळे दीपले जाऊ नयेत, यासाठी ‘केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९’च्‍या अंतर्गत केंद्रशासनाने वर्ष २००५ मध्‍ये सुरक्षा मानकांमध्‍ये आवश्‍यक सुधारणा केल्‍या आहेत. प्रत्‍यक्षात यानुसार कार्यवाही होत नसल्‍याचे सुराज्‍य अभियानाच्‍या लक्षात आले. यानुसार परिवहन आयुक्‍तांकडे याविषयी तक्रार करण्‍यात आली होती.

महाराष्‍ट्र परिवहन आयुक्तांचा आदेश –

२. खरेतर मोटार वाहन कायद्यामध्‍ये दोषींवर कारवाईचे प्रावधान असूनही ‘परिवहन विभाग गांभीर्याने कारवाई करत नाही’, असे आढळून आल्‍यामुळे आम्‍हाला परिवहन आयुक्‍तांकडे तक्रार करावी लागली आहे. परिवहन आयुक्‍तांनी प्रादेशिक आणि उपप्रादेशिक अधिकार्‍यांना केवळ आदेश देऊन न थांबता या प्रकरणी खरोखरच कारवाई होत आहे ना ? याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. यामुळे राज्‍यातील अनेकांचे प्राण वाचतील. यावर कार्यवाही झाली नाही, तर या प्रकरणी आम्‍हाला न्‍यायालयात जावे लागेल, अशी चेतावणी श्री. अभिषेक मुरुकटे यांनी दिली आहे.