Bangladesh Protest In Indian Visa Centre : ढाका (बांगलादेश) येथील भारतीय ‘व्‍हिसा सेंटर’मध्‍ये गोंधळ : भारतविरोधी घोषणा !

(व्‍हिसा म्‍हणजे एखाद्या देशात काही कालावधीसाठी रहाण्‍याची देण्‍यात येणारे अनुमती पत्र.)

ढाका – बांगलादेशाची राजधानी ढाका येथील भारतीय ‘व्‍हिसा सेंटर’मध्‍ये २६ ऑगस्‍ट या दिवशी गोंधळ उडाला. मोठ्या संख्‍येने मुसलमान आंदोलक ‘व्‍हिसा सेंटर’मध्‍येे घुसले आणि त्‍यांनी तेथे भारतविरोधी घोषणाबाजी चालू केली. पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन परिस्‍थिती नियंत्रणात आणली. ढाका येथील भारतीय उच्‍चायुक्‍तांनी हे प्रकरण बांगलादेशाच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाकडे उपस्‍थित केले आहे.

बांगलादेशातील हिंसाचार आणि शेख हसीना सरकारची हकालपट्टी झाल्‍यापासून भारताने बांगलादेशातील व्‍हिसा केंद्रांचे काम लक्षणीयरित्‍या अल्‍प केले आहे. गेल्‍या वर्षी १६ लाख बांगलादेशी लोकांनी भारताला भेट दिली होती. यातील ६० टक्‍के लोक भारतात फिरण्‍यासाठी आले होते. ३० टक्‍के लोक उपचारासाठी भारतात आले होते, तर १० टक्‍के लोक इतर कारणांसाठी भारतात आले होते. (यांतील किती लोक बांगलादेशात परतले, याची आकडेवारीही भारत सरकारने द्यावी आणि बेकायदेशरीरित्‍या भारतात वास्‍तव्‍य करणार्‍या बांगलादेशी नागरिकांना मायदेशी पाठवण्‍यासाठी ठोस उपाययोजना करावी, असेच सर्वसामान्‍य भारतियांना वाटते ! – संपादक) 

संपादकीय भूमिका

बांगलादेशात दिवसेंदिवस भारतविरोधी वातावरण वाढत आहे, त्‍याचेच हे उदाहरण होय. अशा बांगलादेशाला जन्‍माची अद्दल घडवण्‍यासाठी भारताने पावले उचलावीत !