आज २७ ऑगस्ट २०२४ या दिवशी गोपाळकाला आहे. त्यानिमित्त…
‘५.७.२०२४ या दिवशी सकाळी १०.३० ते ११ वाजण्याच्या दरम्यान मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत होते. तेव्हा मला श्रीकृष्णाची आठवण आल्यावर सूक्ष्मातून सुंदर दृश्य दिसले. मला हे दृश्य ८ ते १० दिवस दिसत होते. मला या अनुभूतीतून अपार आनंद दिल्याबद्दल आणि माझ्याकडून काव्य स्वरूपात लिहून घेतल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
रूप तुझे मोहक कृष्णा । नयनरम्य गोकुळ ।
स्वामी (टीप १) प्रकटले आभाळी । झाली सोनेरी सकाळ ।। १ ।।
आणिली सर्वांनी शिदोरी । आणिली काठी आणि कांबळ ।
गोधन घेवून कृष्णासवे । वनी निघाले गोपाळ ।। २ ।।
जिकडे पहावे तिकडे । घनदाट हिरवळ ।
नाद झर्यांचा येतो कानी । खडकातून खळखळ ।। ३ ।।
आनंदे बागडती सारे । गायी, वासरे अन् गोपाळ ।
मधे शोभून दिसतो । नंद राजाचा लडिवाळ (टीप २) ।। ४ ।।
खोड्या करतो चालतांना । भारी अवखळ अन् खट्याळ ।
वात्सल्याने करतो कृष्णा । सार्यांचा प्रतिपाळ ।। ५ ।।
मुरली वाजवितो कान्हा । सुमधुर अन् मंजूळ ।
स्वर कानी पडता । कशी पडली सार्यांना भुरळ ।। ६ ।।
धेनू चरू विसरल्या (टीप ३) । पक्षी राहिले निश्चल (टीप ४) ।
स्तब्ध झाली यमुनामाई । पांगुळले यमुनाजळ (टीप ५) ।। ७ ।।
थांबवि रे थांबवि कृष्णा । पूरे आता तव खेळ (टीप ६) ।
तरूतळी (टीप ७) माध्यान्हासी । बसले घालूनी मंडळ ।। ८ ।।
शिदोरी सोडण्या सर्वांना । खुणवी यशोदेचा बाळ ।
म्हणतो, ‘आणिले मी साखर अन् लोणी । गोड फळे रसाळ’ ।। ९ ।।
मुख माखले सर्वांचे । आले हातावर ओघळ ।
प्रक्षालनासी यमुनेचे । निर्मळ शुद्ध जल ।। १० ।।
एकटक पहाती सारे । निळी, गुलाबी कमलपुष्पे ।
स्वर्गसुखाचा लुटती । अत्यानंद निखळ ।। ११ ।।
खेळ खेळूया रे आपण । पकडा पकडी अन् पळापळ ।
पहा काळ्या ढगांनी । कसे भरले आभाळ ।। १२ ।।
त्वरे निघूया घरासी । झाली आता सायंकाळ ।
गायी-वासरांना घाली । कृष्ण एक दिर्घ शिळ ।। १३ ।।
सवे घेवूनी सर्वांना । परतला घननीळ ।
दिवेलागणीच्या आधी । गाठू या रे गोकुळ ।। १४ ।।
आनंदले माय, तात । घरी आली पोरेबाळे ।
कृष्णा, तुझ्या नगरीत । सर्व सुखांचा सुकाळ ।। १५ ।।
धर्मसंस्थापना करण्या श्रीहरि । पुन्हा अवतरले भूवरी ।
तेचि (टीप ८) साधकांचे मोक्षगुरु । रामनाथी गोकुळ नगरी ।। १६ ।।
भाग्य थोर आमुचे देवा । झाले सगुण दर्शन ।
रूप तुझे चित्ती राहो । हृदयी कोमल चरण’ ।। १७ ।।
टीप १ – स्वामी : सूर्यनारायण
टीप २ – लडिवाळ : श्रीकृष्ण
टीप ३ – धेनू चरू विसरल्या : गायी चरायच्या विसरून गेल्या.टीप ४ – पक्षी राहिले निश्चल : पक्षी आकाशात स्थिरपणे विहार करू लागले.
टीप ५ – पांगुळले यमुनाजळ : यमुनेचे पाणी मंद गतीने वाहू लागले.टीप ६ – खेळ : कृष्णलीला
टीप ७ – तरूतळी : वृक्षाखाली
टीप ८ – तेचि : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले- सौ. विमल माळी (वय ६८ वर्षे), फोंडा, गोवा. (५.७.२०२४)
|