श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर भावजागृतीचा प्रयोग सांगत असतांना संगीत आणि नाट्य यांचा अभ्यास करणार्‍या साधकांना आलेल्या अनुभूती

‘२६ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध केलेल्या लेखात आपण कु. तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४६ वर्षे) यांनी सांगितलेल्या भावजागृतीच्या प्रयोगाविषयी जाणून घेतले. या लेखात आपण त्यांनी सांगितलेला भावजागृतीचा प्रयोग करतांना अन्य साधिकांना आलेल्या अनुभूतींविषयी जाणून घेऊया.
(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/828316.html

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

१. कु. अंजली कानस्कर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

कु. अंजली कानस्कर

१ अ. भगवंताला अनुभवण्यासाठी प्रार्थना करणे : ‘भावजागृतीचा प्रयोग चालू होण्यापूर्वी ‘या भावजागृतीच्या प्रयोगात काही अनुभवायला मिळेल कि नाही ?’, असे मला वाटत होते. तेव्हा मी डोळे मिटून भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना केली, ‘हे भगवंता, माझ्या मनात अनेक विचार चालू आहेत. मला तुला अनुभवायचे आहे; पण कसे अनुभवू ?’, हे मला कळत नाही. माझे मन निर्विचार होण्यासाठी तू मला साहाय्य कर आणि या प्रयोगाच्या माध्यमातून मला तुला अनुभवता येऊ दे.

१ आ. भावजागृतीच्या प्रयोगाच्या वेळी श्रीकृष्णाच्या बाललीलेचे स्मरण होणे : भावजागृतीच्या प्रयोगात ‘भगवान श्रीकृष्ण बाललीला करत आहे’, असे ताईने सांगितल्यावर मला कथ्थक नृत्यातली एक ठुमरी ‘डगर चलत देखो श्याम’ आठवली. त्या ठुमरीत कान्हा राधा आणि गोपी यांच्या खोड्या काढतो अन् गोपी मडकी घेऊन जातांना त्यांची मडकी फोडतो. कान्हाच्या खोड्यांमुळे त्रस्त होऊन राधा आणि सर्व गोपी आपापसांत ठरवतात, ‘कान्हाला शिक्षा म्हणून त्याचे नारीरूप बनवूया.’ गोपी कान्हाला साडी नेसवतात, कुुंकू लावतात आणि त्याच्या नाकात नथ घालतात. कान्हा त्या रूपात मनमोहक दिसत होता. हे पाहून गोपींना त्या श्यामसुंदर मनोहर मोहनाप्रती कृतज्ञता वाटली.

१ इ. बासरीची धून ऐकल्यावर मंत्रमुग्ध झाल्यामुळे स्वतःचे अस्तित्व विसरणे : भावजागृतीच्या प्रयोगात मी बासरीची दैवी धून ऐकून मंत्रमुग्ध झाले. मला स्वतःचे अस्तित्व जाणवत नव्हते. मी हातावर हात ठेवून बसले होते; पण मला स्वत:च्या हाताचा स्पर्श जाणवत नव्हता. त्या वेळी ‘मला त्या स्थितीतून बाहेर येऊ नये’, असे वाटत होते. त्यामुळे त्यानंतर प्रयोगात सांगितलेले मला ऐकू आले नाही.

१ ई. कृतज्ञताभाव जागृत होणे : भावजागृती प्रयोगाच्या शेवटी ‘आपण सर्वजण आपली कला त्या आनंद सागराच्या चरणी अर्पण करत आहोत’, असे ताईने सांगितल्यावर मनात कृतज्ञताभाव दाटून आला. ‘आम्ही सर्व जण श्रीकृष्णाच्या चरणी लीन झालो आहोत’, असे मला वाटले. भावजागृतीचा प्रयोग झाल्यावर तेजलताईने ‘काय अनुभवले ?’, असे विचारल्यावर मला शब्दांत काहीच व्यक्त करावेसे वाटत नव्हते. मला केवळ ‘भावस्थितीतच रहावे’, असे वाटत होते.’

२. कु. मयुरी आगावणे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

कु. मयुरी राजेंद्र आगावणे

२ अ. द्वापरयुगातील जीवन अनुभवणे : ‘असे म्हणतात, ‘देवाचा प्रत्येक अवतार जेव्हा जन्माला येतो, तेव्हा त्यांच्या समवेत सर्व भक्तगणही जन्माला येतात.’ मला नेहमी वाटायचे, ‘आपण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या काळात जन्माला आलो आहोत. तेसुद्धा देव आहेत. ते कृष्णावतारात असतांना मी तेथे असेन का ? मी त्यांच्या समवेत होते, तर त्या वेळी वातावरण आणि आमचे जीवन कसे असेल ?’ तेजलताई सांगत असलेला भावजागृतीचा प्रयोग करतांना आम्ही ‘खरंच द्वापरयुगात आहोत आणि सर्व अनुभवत आहोत’, असे मला वाटले.

२ आ. आनंद आणि शांती अनुभवणे : मागील वर्षी तेजलताईने रामाच्या संदर्भातील भावजागृतीचा प्रयोग सांगितला होता. तेव्हा मला शरणागतभाव अधिक प्रमाणात अनुभवता आला; पण या वेळी त्याही पलीकडे आनंदाचे प्रमाण अधिक होते आणि मनाला वेगळीच शांतता जाणवत होती. ‘त्या स्थितीतून बाहेर येऊच नये. ही स्थिती अनुभवत रहावी’, असे मला वाटत होते.

२ इ. ‘जीवनाचे सार्थक झाले’, असे वाटणे : ‘श्रीकृष्णाच्या चरणी आम्ही आमची कला अर्पण करत आहोत’, असे ताईने सांगितल्यावर मला तसे अनुभवता आले. ‘आता जीवनाचे सार्थक झाले. आता काहीच नको. केवळ देवच हवा’, असे वाटून माझी भावजागृती होत होती.

२ ई. स्वतःचे अस्तित्व विसरून भावस्थिती अनुभवणे : भावजागृतीचा प्रयोग चालू असतांना माझी नमस्काराची मुद्रा होती. नंतर मला स्वतःच्या देहाची जाणीव राहिली नाही. मला बराच वेळ ही भावस्थिती अनुभवता आली.’

३. कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

कु. शर्वरी कानस्कर

३ अ. मन शांत होणे आणि भावजागृतीच्या प्रयोगात सांगितल्याप्रमाणे अनुभवता येणे : ‘भावजागृतीचा प्रयोग चालू होण्यापूर्वी माझे मन शांत झाले होते. ‘भावजागृतीच्या प्रयोगाच्या वेळी सर्व काही थांबले आहे. मी भावजागृतीच्या प्रयोगात सांगत असल्याप्रमाणे अनुभवत आहे’, असे मला सतत जाणवत होते.

३ आ. व्यक्तभावाचे अव्यक्तभावात रूपांतर होऊन शांतीची अनुभूती येणे : भावजागृतीच्या प्रयोगाच्या आरंभी मला आनंद जाणवत होता आणि माझी भावजागृती होत होती. ‘त्या व्यक्तभावाचे रूपांतर अव्यक्तभावात होऊन मला शांतीची अनुभूती कधी आली ?’, हे माझ्या लक्षात आले नाही.

३ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘श्रीविष्णुतत्त्व जागृती’ सोहळ्याचे स्मरण होणे : ताईने भावजागृतीच्या प्रयोगात ‘आता कलाही नको, स्वरही नको, तालही नको, शब्दही नको, तर केवळ भगवंतच हवा’, असे सांगितले. तेव्हा ‘याच स्थितीत राहूया’, असे मला वाटत होते. ११.१२.२०१९ या दिवशी झालेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘श्रीविष्णुतत्त्व जागृती सोहळ्या’चे मला स्मरण झाले. ‘त्यांनी आमच्या सर्वांच्या डोक्यांवर त्यांचे करकमल ठेवले आहेत’, असे मला जाणवत होते.’

४. सौ. भक्ती कुलकर्णी, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

सौ. भक्ती कुलकर्णी

४ अ. ‘श्रीकृष्णाची एक गोपी आहे’, असे वाटून भावजागृती होणे आणि शांत वाटणे : ‘ताईने भावजागृतीचा प्रयोग सांगायला आरंभ केल्यावर ‘मी गोकुळातच आहे’, असे मला जाणवत होते. ‘मीही श्रीकृष्णाची एक गोपी आहे’, असे मला वाटले. त्या प्रयोगामध्ये ज्या साधकामध्ये जी कला आहे, ती कला तो साधक श्रीकृष्णाला भावपूर्ण अर्पण करत होता. तेव्हा माझ्या मनात ‘मी गायनाच्या माध्यमातून श्रीकृष्णाला कसे आळवू ? आणि देवाशी कसे एकरूप होऊ ?’, असे विचार येत होते. प्रयोग अनुभवतांना मला शांत वाटत होते.’

५. सौ. शुभांगी शेळके, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

सौ. शुभांगी शेळके

५ अ. ‘रामनाथी आश्रमाचे गोकुळात रूपांतर होत आहे’, असे जाणवणे : ‘तेजलताई गोकुळाचे वर्णन करत असतांना रामनाथी आश्रमाचे गोकुळात रूपांतर होत आहे’, असे मला वाटले. ‘आपण सर्व साधक गोप-गोपी आहोत आणि कृष्णजन्मोत्सव साजरा करत आहोत’, असे चित्र माझ्या डोळ्यांपुढे आले.

५ आ. ‘सात्त्विक कला महोत्सव भरला आहे’, असे वाटणे : सर्व साधक त्यांच्या कला सादर करून गोकुळाष्टमी साजरी करत असतांना मला वाटले, ‘हा सात्त्विक कलांचा रंगमहोत्सव आहे. संपूर्ण विश्व रंगभूमी झाले आहे आणि रंगभूमीवर संगीत, नृत्य, नाट्य, वादन या सर्व कला साधक कलाकारांकडून पुष्कळ सहजतेने अन् भक्तीभावाने साकार होत आहेत. या वेळी आनंदाला उधाण आले आहे’, असे मला जाणवत होते.

५ इ. ‘देहभान विसरणे आणि केवळ श्रीकृष्णाचे चरण हवेत’, असे वाटणे : भावजागृतीच्या प्रयोगात आम्ही साक्षात् ब्रह्मांडनायक भगवान श्रीकृष्णाच्या हातून लोण्याचा मधुर प्रसाद चाखत होतो. त्या वेळी ‘त्या विश्वंभराने आम्हाला विदेही अवस्थेत नेले आहे’, असे मला वाटले. त्याचा मनोहारी सत्संग लाभल्यावर ‘आता अन्य काही नको. केवळ मी आणि त्याचे चरण’, अशी माझी स्थिती झाली.

५ ई. गुरुचरणी अर्पण झालेली ही निर्मळ कृतज्ञतासुमने अन्य कुणी नसून गुरुमाऊलींची साधकरूपी लेकरेच असल्याची अनुभूती येणे : भावजागृती प्रयोगाच्या शेवटी आमच्याकडून अंतरातील पराकोटीच्या कृतज्ञताभावाने श्रीकृष्णस्वरूप श्री गुरूंच्या चरणी कृतज्ञतासुमने अर्पण झाली. त्यांच्या चरणी अर्पण झालेली ही निर्मळ कृतज्ञतासुमने अन्य कुणी नसून गुरुमाऊलींची साधकरूपी लेकरेच होती. अशी ही अनन्यसाधारण अनुभूती आल्याने भावजागृती प्रयोग संपल्यावर पुष्कळ वेळ आम्ही शांत रसाची अनुभूती घेतली.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १८.९.२०२३)

(समाप्त)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक