(म्‍हणे) ‘मी पंढरीच्‍या पांडुरंगाचे दर्शन घेतो, मीही वैष्‍णव आहे !’ – शरद पवार

शरद पवार

पुणे – मीही वैष्‍णव विचारांचा असून, पंढरीच्‍या पांडुरंगाचे दर्शन घेतो; मात्र त्‍याचा फार गाजावाजा करत नाही. वारकरी संप्रदायात धर्मांध लोकांचा वावर वाढल्‍याने समाजामध्‍ये कटुता निर्माण होत आहे. ही कटुता संपवून सामाजिक ऐक्‍य, एकसंघ समाज घडवायचा असेल, तर आध्‍यात्‍मिक आणि वारकरी लोकांना सक्रीय व्‍हावे लागेल. (वारकरी संप्रदायाला हे मान्‍य आहे का ? ज्‍या धर्मांधांकडून लव्‍ह जिहाद करून हिंदु तरुणी, महिला यांच्‍या निर्घृण हत्‍या केल्‍या जातात, ज्‍या धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमणे केली जातात, हिंदूंच्‍या हत्‍या केल्‍या जातात, त्‍यांचा निषेध शरद पवार यांनी कधी केला आहे का ? बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्‍या आक्रमणांविषयी पवार यांनी एका शब्‍दाने विरोध केला आहे का ? – संपादक) तरुण पिढीला विधायक विचार देऊन त्‍यांची वैचारिक जडणघडण करण्‍यात संत विचारांच्‍या मंडळींनी पुढाकार घ्‍यावा, असे विचार राष्‍ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी मांडले. ‘राष्‍ट्रवादी आध्‍यात्‍मिक व वारकरी आघाडी’च्‍या वतीने ‘शुभारंभ लॉन्‍स’ येथे आयोजित केलेल्‍या ‘वारकरी संमेलना’च्‍या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

शरद पवार म्‍हणाले पुढे म्‍हणाले की, समाजमन हे पुरोगामी विचारांवर आधारित असावे. (पुरोगामी विचार म्‍हणजे हिंदु प्रथा, परंपरा, हिंदु धर्मग्रंथ यांचा द्वेष असेच शरद पवार यांना अपेक्षित आहे का ? – संपादक) कर्मकांड, रूढी-परंपरा या विरोधात भूमिका घेण्‍याची आवश्‍यकता आहे. अनेक लोक ठराविक भूमिकेतून विचार मांडण्‍यावर भर देत आहेत. त्‍यातून जाती-धर्मात तेढ निर्माण होत आहे. चुकीच्‍या गोष्‍टींना खतपाणी घालणार्‍यांना संप्रदायाने दूर ठेवले पाहिजे.’ (‘रामायण आणि महाभारत यांची देशाला आवश्‍यकता नाही’, असे म्‍हणणार्‍यांना वारकरी संप्रदाय आपला म्‍हणणार का ? त्‍यांना संप्रदायापासून दूर ठेवणार का ? – संपादक)
ते म्‍हणाले, ‘माझ्‍याविषयी अनेकदा आस्‍तिक की नास्‍तिक असा वाद रंगला जातो; मात्र सर्वधर्मसमभावाचा विचार देणार्‍या वारकरी संप्रदाय मी मानतो. पंढरीच्‍या पांडुरंगाचे दर्शन घेतो. माझ्‍या अंत:करणात पांडुरंगाचा, ज्ञानोबा-तुकोबांचा विचार असतो. त्‍यामुळे मानसिक समाधान मिळत रहाते.