ढाका (बांगलादेश) – महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशात स्थापन झालेल्या अंतरिम सरकारने तिस्ता नदीच्या पाण्याचा वाद आंतरराष्ट्रीय मंचावर नेऊ, अशी धमकी दिली आहे. अंतरिम सरकारमधील जल आणि पर्यावरण मंत्री रिझवाना हसन यांनी म्हटले आहे की, बांगलादेश तिस्ता नदीच्या पाण्याचा वाद सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंचाकडे जाण्याचा विचार करू शकतो. आम्ही भारतासमवेत मैत्रीपूर्ण संबंध ठेवू; पण आम्ही आमचे दावे ठामपणे मांडू आणि आमच्या न्याय्य मागण्यांसाठी आंतरराष्ट्रीय मंचावरही जाऊ. तिस्ता नदीचा उगम हिमालयातून होतो. ही नदी भारतातील सिक्किम आणि बंगाल राज्यातून वहात बांगलादेशात जाते.
१. तिस्ताविषयी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेचा संदर्भ देत रिझवाना म्हणाल्या की, ममता बॅनर्जी म्हणतात की, लोकांना पाण्यापासून वंचित ठेवून आम्ही इतरांना (बांगलादेशाला) पाणी देणार नाही. त्यामुळे तिस्ताच्या काठावर रहाणार्या आमच्या लोकांच्या अडचणी आम्ही पुढे मांडू. तिस्ता नदीच्या पाण्यावर बांगलादेशाचा हक्क सांगण्यास आम्ही मागे हटणार नाही.
२. रिझवाना हसन यांनी असेही सांगितले की, बांगलादेशाचे नवीन सरकार तिस्तासह सामायिक नद्यांच्या संदर्भात भारत सरकारची चर्चा करील. ‘जॉइंट रिव्हर कमिशन’ तिस्ताच्या पाण्यावर वाटाघाटी करत आहे. या वाटाघाटी करतांना आम्ही बांगलादेशातील तिस्ताच्या काठावर रहणार्या लोकांचाही समावेश करू. आम्हाला पाणी मिळणार कि नाही, हे आमच्या हातात नसून आम्ही या विषयावर बोलू. आम्ही आमचे मत भारताला अगदी स्पष्टपणे सांगू.
संपादकीय भूमिकाहा प्रारंभ असून यापुढे बांगलादेशाकडून अशीच भाषा ऐकायला मिळणार आहे, हे भारताने लक्षात घेऊन त्याला जन्माची अद्दल घडवण्यासाठी सिद्ध व्हावे ! |