५ लाख भाविकांनी घेतले दर्शन
नवी देहली : काश्मीरमधील अमरनाथ यात्रा १९ ऑगस्ट या दिवशी संपली. गेले ५२ दिवस ही यात्रा चालू होती. याद्वारे ५ लाखांहून अधिक भाविकांनी यात सहभाग घेतला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ५० सहस्र अधिक भाविकांनी लाभ घेतला. यात्रेच्या शेवटच्या दिवशी बाबा अमरनाथ यांची पवित्र ‘छडी मुबारक’ अमरनाथ गुहेत पोचली. छडी मुबारकचा वैदिक मंत्रोच्चारात पारंपरिक पूजाविधी पार पडला.
या वर्षी ६ लाख भाविक यात्रेत सहभागी होण्याची शक्यता होती. मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण मार्गावर खाण्यापिण्यासह अन्य व्यवस्था करण्यात आली होती, तसेच आरोग्याच्या संदर्भातही व्यवस्था करण्यात आली होती.
काय आहे छडी मुबारक ?‘छडी मुबारक’ म्हणचे एक चांदीची पवित्र काठी आहे. तिला भगवान शिवाचे प्रतीक मानले जाते. ही एक धार्मिक परंपरा आहे. ही चांदीची काठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या काठीमध्ये भगवान शिवाची अलौकिक शक्ती असल्याचे मानले जाते. |