प्रभु रामाच्या नावावरून राजकारण करणार्‍यांना येणार्‍या निवडणुकीत धडा शिकवायचा आहे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हडपसर (पुणे) येथील श्रीराम चौकातील प्रभु श्रीरामाच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे – प्रभु रामचंद्र आणि अयोध्या आपल्या अस्मिता अन् श्रद्धेचा विषय आहे; मात्र काही लोकांनी त्याचे राजकारण केले आहे. अशा लोकांना येणार्‍या निवडणुकीत धडा शिकवायचा आहे. लोकसभेत ज्या पद्धतीने गाफील राहिलो, तसे विधानसभेत राहू नका, जागृत रहा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. हडपसर येथील हांडेवाडीतील श्रीराम चौकात प्रभु श्रीरामाच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी विविध मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, ‘मला १ दिवस पंतप्रधान करा, मी अयोध्या येथे श्रीरामाचे मंदिर उभारतो आणि काश्मीर मधील ३७० कलमही हटवतो.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराची निर्मिती केली आणि गृहमंत्री अमित शहा यांनी ३७० कलम हटवले.