मुंबई – येत्या काळात विविध सण येणार आहेत. यांमध्ये सर्व समाजांनी सहभागी होऊन ते आनंदाने साजरे करावेत. महाराष्ट्र सामाजिक सलोख्याचे राज्य आहे. राज्याच्या समृद्ध परंपरेला धक्का लावणारे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही, अशी चेतावणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाज विघातक प्रवृत्तींना दिली आहे. नाशिक शहरात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वरील चेतावणी दिली.
या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘कोणत्याही समाजघटकाने कायदा हातात घेऊ नये. काही समस्या असल्यास त्या संवादाने सोडवाव्यात. आपले सण सांस्कृतिक वैविध्याचे प्रतीक आहेत. त्यामुळे प्रत्येक समुदायाने अन्यांच्या भावना लक्षात घेऊन सण साजरे करावेत. सामाजिक प्रसारमाध्यमांवरही कडक लक्ष ठेवले जात आहे. समाजात तेढ निर्माण करणार्या संदेशांवर त्वरित कारवाई केली जाईल. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था यांची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी.’’