‘सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दाते (वय ९१ वर्षे) या सध्या गंभीर आजारी (बेशुद्ध) असून त्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहात आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्र येथील काही साधक रामनाथी आश्रमात सेवेनिमित्त आले होते. २८.७.२०२४ या दिवशी काही साधक पू. दातेआजी यांच्या खोलीत गेल्यावर साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सौ. मीनाक्षी हर्षे, हुब्बळ्ळी, कर्नाटक.
अ. ‘पू. निर्मला दातेआजी झोपल्या आहेत’, असे मला वाटत नव्हते. ‘त्या सर्वांशी संवाद साधत आहेत’, असे मला वाटले.
आ. मला पू. आजींच्या चेहर्यावर निरागस भाव जाणवत होता.’
२. आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. मधुवंती चारुदत्त पिंगळे, मंगळुरू, कर्नाटक.
अ. ‘पू. दातेआजींच्या खोलीतील वातावरण मला शांत वाटत होते.
आ. पू. आजींचा चेहरा अत्यंत तेजस्वी दिसत होता. साधारण गेल्या २ मासांपासून त्या बेशुद्ध असूनही ‘त्यांचा चेहरा पूर्वीसारखाच आहे’, असे मला वाटले.
इ. तेव्हा माझा श्वास आणि नामजप एका लयीत चालू झाला अन् माझे मन शांत झाले.
ई. मी डोळे बंद करून प्रार्थना करत असतांना ‘माझे मन एकाग्र होऊन त्याच स्थितीत रहावे आणि डोळे उघडू नयेत’, असे मला वाटत होते.’
३. श्री. रमेश लुकतुके (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, मिरज.
अ. ‘पू. दातेआजी यांच्या खोलीत गेल्यावर मला हलकेपणा जाणवला.
आ. ‘पू. आजी सर्वांशी बोलत आहेत’, असे मला जाणवले.
इ. मी पू. आजींच्या चरणांना स्पर्श केल्यावर मला उबदारपणा जाणवला. त्यांच्या चरणांमधून चैतन्य लहरी आणि शक्ती प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २.८.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |