१. साधनेला आरंभ करण्यापूर्वी साधिकेची स्थिती
१ अ. साधिकेला असलेला न्यूनगंड : ‘मला लहानपणापासूनच अनेक वेळा एकटेपणा जाणवत असे. मी आई-वडिलांचे प्रेम अनुभवू शकले नाही. मला कुणाशीही अधिक बोलता येत नव्हते. ‘मी कुणाला आवडत नाही आणि मी काही कामाची नाही’, अशी न्यूनगंडाची भावना माझ्या मनाला नेहमीच ग्रासलेली असायची.
१ आ. वैवाहिक जीवनात साधिकेला झालेला त्रास : माझे लग्न वर्ष २०१६ मध्ये २३ व्या वर्षी झाले. मी माझ्या नवीन जीवनात मोठ्या अपेक्षेने प्रवेश केला; पण त्या जीवनात माझ्या वाट्याला अलिप्तपणा, अपराधीपणा आणि दुर्लक्षित रहाणे, हेच आले.
१ इ. साधिकेला नैराश्य येणे : ‘हे माझे प्रारब्ध आहे’, या विचाराने मी पुष्कळ सहन केले. मला नैराश्य आल्याने मी मानसोपचार तज्ञांकडे समुपदेशनासाठी गेले आणि त्यांनी सांगितलेली औषधे घेतली; पण जीवनाला गती येत नव्हती. मला कुणीही साहाय्य करत नव्हते. माझा ठाम विश्वास होता, ‘केवळ मृत्यूच मला वाचवू शकतो.’
२. बहिणीच्या माध्यमातून सनातन संस्थेच्या संपर्कात येणे आणि देवाची कृपा अनुभवणे
मी लग्नानंतर देवाच्या विचारांपासून दूर गेले; पण परमेश्वराने मला सोडले नाही. देवाने मला माझी धाकटी बहीण (वर्षा) हिच्या माध्यमातून सनातन संस्थेशी ओळख करून देऊन साधनेचा मार्ग दाखवला आणि सत्संगाला जोडले.
२ अ. साधनेला आरंभ केल्यावर देवाला दोष न देता परिस्थिती स्वीकारणे : मी साधनेला आरंभ करून ३ वर्षे झाली. मी साधना चालू केल्यानंतर माझ्या आयुष्यात पुष्कळ पालट झाला. मी दु:खाचा स्वीकार करायला शिकले आहे. प्रत्येक कठीण टप्प्यासाठी देवाला दोष देण्याऐवजी मला वाटते, ‘माझ्या आयुष्यातील सर्व कठीण टप्पे, ही माझ्या कर्माची फळे आहेत आणि माझा प्रत्येक जन्म माझ्या कर्माची फळे भोगण्यासाठी आहे.’
२ आ. साधनेमुळे परिस्थिती अनुकूल होणे : आता मला परिस्थिती अनुकूल झाली आहे. ‘माझा घटस्फोट झाला आहे’, याचे दु:ख मला होत नाही. मी लहानशी नोकरी करते. मी दुचाकी गाडी चालवायला शिकले. देवाने मला माझ्या अपेक्षेपेक्षा चांगली दुचाकी गाडी दिली. मी ‘गाडी हा देवाचा रथ आहे’, असा भाव ठेवते.
२ इ. साधना करण्याचे महत्त्व लक्षात येणे : ‘आपली परिस्थिती कितीही वाईट असली, तरीही आपण साधना करत राहिलो, तर आपले प्रारब्ध सुकर होते. यासाठी भगवंताचे अस्तित्व मानून साधना करायला हवी’, असे मला जाणवले. आता मला वाटते, ‘लोक साधना केल्याविना कसे जगू शकतात ?’
– हर्षा हरिन्द्रन् (वय ३० वर्षे), कन्नूर, केरळ. (१५.७.२०२४)