सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना ‘विशेष सेवा पदक’

समीर शेख

सातारा, १६ ऑगस्ट (वार्ता.) – सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह जिल्ह्यातील ७ जणांना ‘विशेष सेवा पदक’ घोषित झाले आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसक आणि अनधिकृत कारवायांना परिणामकारक आळा घालण्यासाठी दिलेल्या योगदानाविषयी हा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह परितोष दातीर, तेजस्विनी देशमुख, सचिन भिलारे, अविनाश गवळी, मच्छिंद्रनाथ पाटील, प्रिया पाटील अशी सातारा जिल्ह्यात सध्या कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकार्‍यांची नावे आहेत.

समीर शेख हे वर्ष २०२१ ते २०२३ या कालावधीत गडचिरोली येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कर्तव्यावर होते. शेख यांनी त्या वेळी पोलीस प्रशासनाची धुरा भक्कमपणे सांभाळत अनेक मोहिमांमध्ये सक्रीय सहभाग घेत त्या यशस्वी केल्या. गडचिरोली येथे २ वर्षे सेवा केल्यानंतर ते सातारा येथे वर्ष २०२३ मध्ये पोलीस अधीक्षक पदावर सेवेत रुजू झाले. गडचिरोली येथे विविध योजनांच्या माध्यमातून तेथील नागरिकांना योग्य न्याय देण्यासाठी समीर शेख यांनी विशेष प्रयत्न केले. २ वर्षांत अडीच लाख नागरिकांपर्यंत ही योजना पोचवण्यात ते यशस्वी झाले. शासकीय योजनांवर प्रभावीपणे कार्यवाही केल्यामुळे त्यांना ‘विशेष सेवा पदक’ घोषित झाले आहे. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.