कुडाळ शहरातील बनावट नोटा प्रकरणातील २ आरोपींवर आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा प्रविष्ट
कुडाळ – बँकेचे कर्ज (लोन) मिळवून देतो, असे सांगून एका व्यक्तीकडून ५७ सहस्र ५०२ रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणी शहरातील बनावट नोटा प्रकरणातील संशयित आरोपी सुरेंद्र रामचंद्र ठाकूर (रहाणार पलुस, जिल्हा सांगली) आणि विजय रविकांत शिंदे (रहाणार मुळदे, तालुका कुडाळ) या दोघांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कुडाळ येथील पांडुरंग परब यांनी कुडाळ एम्.आय.डी.सी. येथे करार पद्धतीने एक भूमी घेतली आहे. या भूमीत त्यांना ‘इंजिनीयरिंग वर्कशॉप’साठी शेड बांधायची होती. या कामासाठी विजय शिंदे याने त्याचा मित्र सुरेंद्र ठाकूर याच्या माध्यमातून बँकेचे कर्ज मिळवून देतो, असे सांगितले. त्यानंतर कर्जाच्या कामासाठी प्रक्रिया शुल्क (प्रोसेसिंग फी) म्हणून ३ जून ते ११ जुलै या कालावधीत त्यांना ४६ सहस्र ५०२ रुपये ‘ऑनलाईन’ पाठवले. १३ जुलैला सुरेंद्र ठाकूर याला पुन्हा ११ सहस्र रुपये दिले. यानंतर पांडुरंग परब यांनी कर्जाविषयी ठाकूर याच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा घेतला. त्या वेळी ठाकूर याने ‘पैसे देणार नाही. तुला काय करायचे ते कर’, अशी धमकी दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पांडुरंग परब यांच्या लक्षात आले. कुडाळ शहरातील बनावट नोटा प्रकरणी सुरेंद्र ठाकूर याला अटक केल्याचे समजल्यावर पांडुरंग परब यांनी पोलीस ठाण्यात ठाकूर याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. त्यानुसार पोलिसांनी ठाकूर आणि शिंदे यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.