‘नोव्हेंबर २०२३ मध्ये मी ‘गिरनार परिक्रमा’ केली. यापूर्वी मी कधीही गिरनारला गेलो नव्हतो आणि परिक्रमाही केली नव्हती. त्या वेळी जे काही समजले आणि जाणवले, ‘ते सर्व बुद्धीच्या पलीकडील आहे’, असे मला वाटते. ‘ज्या परिक्रमेत प्रत्यक्ष देवतांचा ५ दिवस संचार असतो’, अशा अद्भुत परिक्रमेत मला सहभागी होता आले. ही निश्चितच दत्तप्रभूंचीच इच्छा होती. परिक्रमेच्या वेळी मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. ‘गिरनार परिक्रमा’ आणि तिचे महत्त्व !
‘गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेवून पर्वताला प्रदक्षिणा घालणे’, यालाच ‘परिक्रमा करणे’, असे म्हणतात. पुरातन काळापासून गिरनार पर्वताची परिक्रमा करणे चालू आहे. ‘कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा’ या ५ दिवसांत ‘गिरनार परिक्रमा’ करतात. या कालावधीत ‘देव आणि त्यांचे गणही परिक्रमेसाठी येतात’, अशी आख्यायिका आहे. या परिक्रमेमुळे मानवाकडून कळत नकळत घडलेल्या पापांपासून मानवाला मुक्ती मिळते. त्यामुळे भक्त मोठ्या संख्येने ही परिक्रमा करतात.
२. परिक्रमेला जाण्यासाठी ‘ट्रॅव्हल्स’चे आरक्षण न मिळणे आणि एक आरक्षण रहित झाल्याने परिक्रमेचा अद्भुत अनुभव घेता येणे
मी एकदा पीठापूर (आंध्रप्रदेश) येथे गेलो होतो. तेथे मला गुजरात राज्यातील ‘गिरनार परिक्रमे’विषयी माहिती मिळाली. माहिती ऐकल्यावर ‘गिरनार परिक्रमेला जायचेच’, असे विचार माझ्या मनात आले. परिक्रमेला जाण्यासाठी मला कोणत्याही ‘ट्रॅव्हल्स’चे आरक्षण मिळत नव्हते. काही दिवसांनी एक आरक्षण रहित झाल्याने मला परिक्रमेला जाता आले. ‘परिक्रमेला जाता येणे’, हा माझ्यासाठी एक चमत्कारच म्हणता येईल ! मी ही परिक्रमा सुखरूप पूर्ण करू शकलो. दुःखाचे डोंगर पार करतांना अलगद सुख येते, त्याप्रमाणे माझ्या आयुष्यात या परिक्रमेचे महत्त्व आहे.
मानवी जीवनातील प्रत्येक टप्प्याचे प्रतीक म्हणजे गिरनार परिक्रमा आहे ! परिक्रमा करतांना ना थकवा येतो, ना दम लागतो. देहभान विसरून केवळ ध्यासाने, भक्तीने आणि नामजप करत मार्गक्रमण केले की, एक समाधान लाभते अन् गुरुकृपेची निश्चितच प्रचीती येते.
३. श्री दत्तपादुकांचे दर्शन
३ अ. परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करून परिक्रमेला आरंभ करणे आणि १० सहस्र पायर्या चढूनही थकवा न जाणवता ५ घंट्यांत ‘गुरुशिखर’ या स्थानी पोचणे : २६.११.२०२३ या दिवशी पहाटे ३ वाजता मी परात्पर गुरु डॉक्टरांना (श्री गुरुदेवांना) प्रार्थना केली आणि माझी गिरनार परिक्रमा चालू केली. मी माझ्या ‘सॅक’वर (पाठीवर अडकवण्याची एक बॅग) ब्रह्मोत्सवाला मिळालेला परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र असलेला ‘बॅच’ लावला होता, तसेच माझा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप अखंड होत होता. १०,००० पायर्या चढून जाणे, हे शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी पहाणारे असले, तरी ‘तेथे एकदा तरी जायलाच पाहिजे’, असे ते स्थान आहे. गिरनार म्हणजे ‘भगवान दत्तात्रेयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनित केलेले आणि १२ सहस्र वर्षे तपाने सिद्ध केलेले स्थान आहे’, अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. ५ घंट्यांत आम्ही ‘गुरुशिखर’ या स्थानी पोचलो.
३ आ. पर्वतावर जाऊन भगवान दत्तात्रेयांनी १२,००० वर्षे तपश्चर्या केलेले स्थान आणि दत्तपादुका यांचे दर्शन घेणे : श्री दत्तात्रेयांच्या चरणपादुका उमटलेल्या या शिखरावर चढतांना थंडी, वारा आणि पाऊस यांचा वेगळाच अनुभव येतो. याच स्थानी भगवान दत्तात्रेयांनी १२,००० वर्षे तपश्चर्या केली. हे त्यांचे अक्षय्य निवासस्थान आहे. १० बाय १२ चौरस फूट असलेल्या या मंदिरामध्ये भगवान दत्तात्रेयांच्या पादुका, एक सुबक मूर्ती आणि एक पुजारी बसू शकतील, एवढीच जागा आहे. बाजूला असलेल्या प्राचीन गणेश अन् हनुमान यांच्या मूर्ती लक्ष वेधून घेतात.
३ इ. मंदिरात असलेले प्राचीन शिवलिंग आणि प्राचीन घंटा : मंदिरातच पादुकांच्या मागे भूमीत खोलवर एक प्राचीन शिवलिंग आहे. त्या ठिकाणी एक प्राचीन घंटा आहे. ‘आपल्या पूर्वजांची नावे घेत घंटानाद केल्यावर पूर्वजांना मुक्ती मिळते’, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
श्री दत्तपादुकांचे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडताच मला हलके आणि प्रसन्न वाटले. १० सहस्र पायर्या चढूनही मला थकवा जाणवत नव्हता.
४. चारी बाजूंनी घनघोर जंगल, उंच उंच झाडे, झावळ्या आणि मोठमोठे वृक्ष अशा घनदाट जंगलातून जाणारा अन् हिंस्र प्राणी असलेला परिक्रमेचा मार्ग !
गिरनार पर्वताच्या परिसरात असलेले प्रसिद्ध ‘गीर अभयारण्य’ सध्या वन विभागाच्या अखत्यारीत आहे. परिक्रमेचा मार्ग हा पूर्णपणे जंगलातून जाणारा आहे. अन्य दिवसांमध्ये या जंगलात सर्वांना प्रवेश नसतो. केवळ परिक्रमेच्या कालावधीत ५ दिवस भाविकांना प्रवेश मिळतो. या जंगलात मुंग्या, विंचू, तसेच सिंह आदी प्राणी आहेत; पण परिक्रमा करतांना ते भाविकांना कोणताही त्रास देत नाहीत. ही श्री दत्तगुरूंचीच कृपा आहे. चारी बाजूंनी घनघोर जंगल, उंच उंच झाडे, झावळ्या आणि मोठमोठे वृक्ष यांतून वाट काढत दत्तभक्त परिक्रमा करत असतात. घनदाट जंगलातून जाणारा हा मार्ग काटे-कुटे आणि दगडे यांनी घेरलेला आहे, तरीही भक्त श्रद्धेने हा मार्ग सोपा बनवतात.
५. गिरनार पर्वताची परिक्रमा करतांना आणि गुरुशिखराच्या १० सहस्र पायर्या चढतांना जाणवलेला भावार्थ !
५ अ. परिक्रमेच्या मार्गातील तीन पर्वत : परिक्रमेच्या मार्गात ३ पर्वत असून ते चढून उतरतांना काही ठिकाणी तीव्र चढ, तर काही ठिकाणी अती तीव्र उतार आहे. परिक्रमेतील तीन पर्वत हे मानवाच्या जीवनातील तीन टप्प्यांचे चित्रण करतात. ते टप्पे म्हणजे ‘बालपण’, ‘तारुण्य’ आणि ‘वृद्धावस्था’ !
५ अ १. बालपण : पहिला डोंगर चढला आहे, हे आपल्याला कळतही नाही; कारण तो चढायला सहज आहे, तसेच आपले बालपण आहे, जे सहज आणि निरागस असते.
५ अ २. तारुण्य : दुसरा डोंगर जो खूप उंच होता आणि त्याची चढण खडतर होती. तो डोंगर तरुण वयातील जीवन संघर्ष दर्शवतो.
५ अ ३. वृद्धावस्था : तिसरा आणि शेवटचा डोंगर चढण्यासाठी कठीण नाही. त्याचा उतार तीव्र आहे. जो जीवनातील शेवटचा टप्पा वृद्धत्व दर्शवतो.
५ आ. गुरुशिखराच्या १० सहस्र पायर्या चढणे, म्हणजे स्वभावदोष आणि अहं यांचा त्याग करणे अन् त्यानंतरच श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडत असणे : गुरुशिखरापर्यंत पोचण्यासाठी १० सहस्र पायर्या चढून जावे लागते. प्रत्येक पायरी चढतांना आपल्यातील अनेक दुर्गुणांचा त्याग करून चढायचे असते आणि सर्वांत शेवटच्या पायरीवर त्यागाचाही त्याग करावा लागतो. यावरून ‘आपल्यातील सर्व स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होते, त्याच वेळी श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडते. जोपर्यंत स्वतःतील ‘मी’ मरत नाही, तोपर्यंत मनाचा गाभारा सर्वार्थाने पवित्र होत नाही’, असे मला वाटले.
६. परिक्रमेच्या वेळी आलेल्या अनुभूती
६ अ. अखंड नामजप होणे : संपूर्ण परिक्रमेत माझा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप अखंड होत होता. त्यामुळे ‘परिक्रमेचा परिसर किंवा परिक्रमेत काय पाहिले ?’, ते मला आठवतही नव्हते. त्यावरून मला दत्तगुरूंच्या नामजपातील खरी शक्ती कळली.
६ आ. परात्पर गुरु डॉक्टरांना पूर्णपणे शरण जाणे आणि ‘ते आशीर्वाद देत आहेत’, असे वाटणे : संपूर्ण परिक्रमेत मी परात्पर गुरु डॉक्टरांना पूर्णपणे शरण गेलो होतो. तेव्हा ‘गुरुदेव सतत माझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव करत आहेत’, असे मला वाटले. माझे मन त्या वेळेस सर्व भौतिक इच्छांपासून पूर्णपणे मुक्त झाले होते. परिक्रमेत एक गोष्ट लक्षात आली की, समजण्यापलीकडे नक्कीच अशी एक दैवी शक्ती आहे, जी केवळ अनुभवता येते. त्यामुळे केवळ ‘एवढेच म्हणावे’, असे वाटते.
या उरात श्वास असेतो दत्तनाम घेत रहावे ।
नाम घेता घेता गुरुदत्त माझ्या हृदयी वसावे ।।’
– श्री. मयुरेश अनगरकर (वय ४० वर्षे), चिंचवड, पुणे. (१०.३.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |