१. कुटुंबियांची साधना होण्यासाठी त्याग करणे
‘पू. लक्ष्मण गोरेआजोबा पूर्वी गोरेगाव (मुंबई) येथे ६० वर्षे रहात होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करत होते. पू. आजोबा गोरेगावातील अनेक जणांना प्रिय होते. त्यांची पत्नी आणि मुलगी ‘देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाजवळ रहायला जायचे’, असे म्हणत होत्या. तेव्हा पू. आजोबांना साधनेविषयी विशेष माहिती नव्हती. गोरेगाव सोडून पनवेल येथे रहाण्याची पू. आजोबांच्या मनाची सिद्धता नव्हती, तरीही कुटुंबियांच्या साधनेसाठी ते पनवेल येथे रहायला आले. हा त्यांचा फार मोठा त्याग आहे. ‘या माध्यमातून पू. आजोबांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा संपादन केली’, असे आम्हाला वाटते.
२. आश्रम आणि आश्रमसेवा यांविषयीचे विचार मनावर बिंबलेले असणे
अ. पूर्वी पू. आजोबा देवद (पनवेल) येथे वास्तव्यास असतांना तेथील सनातनच्या आश्रमात सेवेला जात असत. तेव्हा ते संध्याकाळी आश्रम परिसरातील दिवे लावण्याची सेवा करायचे. त्यांनी तेव्हा केलेली सेवा त्यांच्या स्मरणात राहिली आहे. सध्या ते वयोमानानुसार गोवा येथील त्यांच्या घरी असतात. सायंकाळचे ७ वाजल्यावर ते ‘मला आश्रमातील दिवे लावायचे आहेत’, असे सांगून घराच्या बाहेरील दिवे लावायला जातात.
आ. आम्ही घराच्या पहिल्या माळ्यावर सेवा करत असतो आणि पू. आजोबा तळमजल्यावर असतात. कधी तरी पू. आजोबा पहिल्या माळ्यावर येतात. त्यांना खाली परत जाण्यास उशीर झाल्यावर ते म्हणतात, ‘‘आता उशीर झाला आहे. घरी कळवूया. आज मी आश्रमातच थांबतो. मला सोडायला वेगळ्या साधकांचे नियोजन करायला नको.’’
यावरून ‘आश्रम आणि आश्रमसेवा यांविषयीचे विचार त्यांच्या अंतर्मनावर बिंबलेले आहेत’, असे आम्हाला जाणवते अन् आमची भावजागृती होते.
३. कुटुंबीय आणि पाहुणे यांच्याशी ‘साधक’ या भावाने वागणे
अ. पू. आजोबा आणि आम्ही (सौ. मंगला गोरे (पू. लक्ष्मण गोरे यांच्या पत्नी), सौ. गौरी आफळे (मुलगी) आणि श्री. वैभव आफळे (जावई)) गोवा येथील घरी एकत्र रहातो. एकदा गौरी पू. आजोबांसाठी चहा बनवत होती. मध्येच तिला भ्रमणभाष आल्यावर ती बोलण्यासाठी स्वयंपाकघराच्या बाहेर गेली. तेव्हा पू. आजोबा आम्हाला म्हणाले, ‘‘आश्रमातील स्वयंपाकघरातील ताईला भ्रमणभाष आला; म्हणून त्या स्वयंपाकघराच्या बाहेर गेल्या आहेत. त्या परत आल्यावर मला चहा देतील.’’
– श्री. वैभव आफळे (पू. लक्ष्मण गोरे यांचे जावई, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५४ वर्षे), फोंडा, गोवा.
आ. ‘आमच्याकडून त्यांना औषध देण्यास उशीर झाल्यावर ते म्हणतात, ‘‘आज तुम्हाला तातडीची सेवा आली होती का ? साधकसंख्या अल्प आहे का ?’’ – सौ. गौरी आफळे (पू. लक्ष्मण गोरे यांची मुलगी), फोंडा, गोवा.
इ. ‘आमच्या घरी कोणी पाहुणे आले, तर पू. आजोबा म्हणतात, ‘‘साधकांची निवास आणि महाप्रसाद यांची व्यवस्था केली आहे ना ? ते जाणार असतील, तेव्हा त्यांची वाहनाची सोय केली आहे ना ?’’ – सौ. मंगला गोरे (पू. लक्ष्मण गोरे यांच्या पत्नी, वय ७५ वर्षे), फोंडा, गोवा.
४. सतत ईश्वराच्या अनुसंधानात असणे
‘वयोमानानुसार पू. आजोबांची शारीरिक क्षमता न्यून होत चालली असली, तरी त्यांच्या सर्व कृती आणि विचार हे भगवंतांशी जोडलेले असतात.
अ. पू. आजोबा काही दिवसांपूर्वी घरातच पडले. तेव्हा एका साधकाने त्यांना त्याविषयी विचारल्यावर पू. आजोबांनी ‘ईश्वराची कृपा !’, असे म्हणून आकाशाकडे बोट केले. वर्ष २०२४ च्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात विश्व हिंदू परिषदेचे एक हितचिंतक घरी आले होते. त्यांनी पू. आजोबांची विचारपूस केल्यावर पू. आजोबांनी त्यांना ‘ईश्वराची कृपा !’, इतकेच उत्तर दिले.’ – श्री. वैभव आफळे
आ. ‘आम्ही पू. आजोबांना काही विचारले, तर ते म्हणतात, ‘‘मी नामजप करत आहे.’’
– श्री. वैभव आफळे, सौ. गौरी आफळे आणि सौ. मंगला गोरे
इ. ‘कधी कधी ते मला मध्यरात्री उठवतात आणि ‘मी कोणता जप करू ?’, असे विचारतात.’ – सौ. मंगला गोरे
ई. ‘एकदा मध्यरात्री त्यांची वेगळीच स्थिती पाहून मी त्यांना त्याविषयी विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आताच नवीन जप करायला सांगितला आहे. आता मी तो करत आहे.’’
उ. आम्ही त्यांना ‘कोणता नामजप करत आहात ?’, असे विचारल्यावर त्यांना काही सांगता येत नाही. ‘ते निर्विचार अवस्थेत असतात’, असे आम्हाला वाटते. (याविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘पू. आजोबा निर्विचार स्थितीत आहेत. त्यामुळे त्यांना आता नेहमी ‘निर्विचार’ हाच जप करू दे.’’) – श्री. वैभव आफळे
५. कृतज्ञताभाव
बर्याच वेळा आम्ही ‘पू. आजोबांना प्रसाद आणि महाप्रसाद देणे, औषध देणे, बाहेर घेऊन जाणे’ इत्यादी सेवा करत असतो. तेव्हा ते आम्हाला म्हणतात, ‘‘तुम्ही सर्व जण माझ्यासाठी किती करता ! मला परम पूज्यांच्या चरणी कृतज्ञता वाटते.’’
– सौ. गौरी आफळे
‘आम्हाला संतरत्नाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि ‘आम्हाला त्यांचा साधनेच्या दृष्टीने लाभ करून घेता येऊ दे’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.’
– श्री. वैभव आफळे, सौ. गौरी आफळे आणि सौ. मंगला गोरे (वय ७५ वर्षे), फोंडा, गोवा. (२६.७.२०२४)