कोल्हापूर विभागासाठी लवकरच १०० नवीन गाड्या येणार ! – वीरेंद्र कदम, उपमहाव्यवस्थापक, एस्.टी.


कोल्हापूर, १५ ऑगस्ट (वार्ता.)
– एस्.टी.च्या उत्पन्नवाढीसाठी सातत्याने आमचे प्रयत्न असून प्रतिकिलोमीटर उत्पन्न वाढवण्यासाठी आमचा भर आहे. सध्या संचित तोटा ३० कोटी रुपये असून मार्च २०२५ पर्यंत एस्.टी. पूर्णत: लाभात असेल, या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. कोल्हापूर विभागाचे दैनंदिन उत्पन्न साधारणत: १ कोटी ३० लाख रुपये आहे.

 पत्रकारांशी संवाद साधतांना उपमहाव्यवस्थापक वीरेंद्र कदम

कोल्हापूर विभागासाठी ‘अशोक लेलँड’च्या १०० नवीन गाड्या येणार असून पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र नवीन गाड्या मिळतील, अशी माहिती एस्.टी.चे उपमहाव्यवस्थापक तथा कोल्हापूर विभागाचे पालक अधिकारी वीरेंद्र कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी कोल्हापूर विभाग नियंत्रक सौ. अनघा बारटक्के, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, यंत्र अभियंता य.मा. कानतोडे उपस्थित होते.

१. यापुढील काळात धार्मिक तीर्थाटनावर भर देण्यात येत असून अक्कलकोट दर्शन, ११ मारुति दर्शन, गणपतिपुळे दर्शन, तुळजापूर दर्शन यांसह जिल्ह्यातील आणि राज्यातील प्रत्येक सण-उत्सवाच्या निमित्ताने आता ‘एस्.टी.’ने लक्ष केंद्रित केले आहे. हे तीर्थाटन अभियान आता वर्षभर चालू असेल. यात कुणाची मागणी आल्यास ४४ पेक्षा अधिक प्रवाशांना थेट बस उपलब्ध करून देण्यात येईल. यापुढील काळत गड-दुर्ग सहल यांच्यावरही लक्ष केंद्रित करण्यात येईल, त्यासाठी शाळांना विशेष संपर्क साधण्यात येईल. गड-दुर्ग हे महाराष्ट्राचे वैभव असून विद्यार्थ्यांनी ते पाहिलेच पाहिजे. शेगावसाठीही विशेष थेट गाडी चालू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.

२. विद्यार्थी, महिला, ७५ वर्षांवरील वृद्ध अशा विविध वयोगटांतील प्रवाशांसाठी शासनाच्या विविध सवलती आहेत. त्यातील विशेषकरून ७५ वर्षांवरील व्यक्तींसाठी ‘त्याचे उत्पन्न मिळत नाही’, असा चुकीचा विचार करून जर कुणी वाहक वृद्ध अथवा अन्य कोणत्याही अन्य योजनांमधील प्रवाशास गाडीत चढण्यास मनाई करत असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात ७५ वर्षांहून अधिक वय असलेल्यांची संख्या अधिक असून त्यांना कुठेही असुविधा होणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

३. संभाजीनगर खंडपिठाच्या आदेशानुसार बसस्थानक परिसराच्या २०० मीटर अंतरापर्यंत कोणतीही खासगी वाहतूक करण्यास मनाई आहे. याचे पालन होते कि नाही, ते पहाण्यासाठी आणि त्यावर वचक ठेवण्यासाठी बसस्थानक परिसरात आता ‘सी.सी.टी. व्ही.’ लावण्यात आले आहेत. अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या कुणी व्यक्ती, संघटना हे या परिसरात आढळल्यास त्यांच्या संदर्भातील तक्रार आम्ही तात्काळ पोलीस ठाण्यांमध्ये करत आहोत.

येणार्‍या २-३ महिन्यांत कोल्हापूर विभागासाठी १०० इलेक्ट्रिक बस येणार असून त्यासाठी भारीत करण्यासाठीचे केंद्र, तसेच अन्य सिद्धता चालू आहे, अशी माहिती कोल्हापूर विभाग नियंत्रक सौ. अनघा बारटक्के यांनी पत्रकारांना दिली.