आमदार डिलायला लोबो आणि हणजूण येथील नागरिक यांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन
पणजी, १४ ऑगस्ट (वार्ता.) – हणजूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘नाईट पार्ट्यां’च्या कर्णकर्कश आवाजाला कंटाळलेल्या नागरिकांनी पुन्हा एकदा भाजपच्या शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांच्या नेतृत्वाखाली १४ ऑगस्ट या दिवशी हणजूण पोलीस ठाण्यात धडक दिली. पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक परेश नाईक यांची भेट घेऊन ध्वनीप्रदूषण रोखण्याची मागणी करण्यात आली, अन्यथा उच्च न्यायालयाच्या दारात बसून आंदोलन छेडण्याची चेतावणी देण्यात आली.
१. यापूर्वीही आमदार डिलायला लोबो यांनी याच सूत्रावरून हणजूण पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांची भेट घेतली होती, तसेच याच सूत्रावर क्लब मालकांसमवेतही बैठक घेतली होती. याविषयी स्थानिकांनी मेणबत्ती मोर्चाही अनेक वेळा काढला; मात्र ध्वनीप्रदूषण चालूच राहिले.
२. आमदार डिलायला लोबो म्हणाल्या, ‘‘नाईट पार्ट्यां’चे ध्वनीप्रदूषण सहनशीलतेच्या पलीकडे गेले आहे. यामुळे पोलिसांनी लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. लोकांना त्रास होत असल्याने आम्हाला पुन्हा पोलीस ठाण्यात यावे लागत आहे. हणजूण परिसरात विशेषतः वागातोर येथील रहिवासी परिसरात ‘रेस्टॉरंट’मधून ध्वनीप्रदूषण अधिक प्रमाणात होत आहे. कायद्यानुसार रात्री १० वाजता संगीत बंद केले पाहिजे, तसेच ६५ डेसिबलपर्यंत संगीताचा आवाज ठेवण्यास मान्यता आहे; मात्र याचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते.’’
संपादकीय भूमिकानागरिकांवर अशी पाळी आणणारे पोलीस आणि प्रशासन काय कामाचे ? |