‘मी गेल्या ४ वर्षांपासून साधनेत आहे. मी समष्टी साधना करत असतांना मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. ‘संतांचा संकल्प आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची कृपा’ यांमुळे आधुनिक वैद्यांची सत्संगात उपस्थिती अधिक असणे
मी ‘रेडिओलॉजिस्ट’ (क्ष-किरणतज्ञ) आहे. मी सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे संत, वय ४८ वर्षे) यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक येथील आधुनिक वैद्य आणि अधिवक्ता यांच्यासाठी सत्संग घेण्याची सेवा करत आहे. सध्या ३ सत्संग चालू आहेत. दोन आठवड्यांपूर्वी एक नवीन सत्संग चालू करण्यात आला आहे. या सत्संगात ८० आधुनिक वैद्य उपस्थित असतात. आरंभी आधुनिक वैद्यांना एकत्रित करण्यासाठी मला पुष्कळ प्रयत्न करावे लागत होते. आता मी अत्यल्प प्रयत्न करूनही ‘संतांचा संकल्प आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची कृपा’ यांमुळे सत्संगात उपस्थिती अधिक असते. याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले म्हणाले, ‘‘आपल्यात भाव आणि तळमळ असल्यास आपल्याला ईश्वराचे साहाय्य मिळते. तुमच्यात आहे; म्हणून तुम्हाला अशी अनुभूती येत आहे.’’
२. पू. रामानंदअण्णा यांचा सत्संग लाभल्यावर ‘स्वतःला साधना करायची आहे आणि साधनेत प्रगती करायची आहे’, हे ध्येय निश्चित होणे
मला पू. रमानंदअण्णा यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. मला त्यांच्या समवेत एका वर्षात ५ वेळा प्रचारदौर्यावर जाण्याची संधी मिळाली. त्यांच्या समवेत झालेल्या प्रत्येक दौर्यानंतर माझ्यामध्ये पालट होत गेले. मी जेव्हा प्रथमच त्यांच्या समवेत दौर्यावर गेलो होतो, तेव्हा माझ्या मनात ‘माया आणि साधना’ या संदर्भातील विचार होते. या दौर्यात माझी अंतर्मुखता वाढली. मला वाटले, ‘राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती सुधारण्यासाठी माझ्याकडून काहीच प्रयत्न होत नाहीत.’ त्या वेळी मी ३ दिवस पू. रमानंद अण्णांच्या समवेत होतो. त्यांचे मार्गदर्शन लाभल्यानंतर ‘मला साधना करायची आहे आणि साधनेत प्रगती करायची आहे’, अशी माझी ध्येय निश्चिती झाली.
३. स्वतःमधील ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूवर मात करू शकणे
पूर्वी मला ‘चुका सांगणे’ आणि ‘क्षमायाचना करणे’ यासाठी पुष्कळ संघर्ष करावा लागत होता. मागील दौर्यात मी १० दिवस पू. अण्णांच्या समवेत होतो. त्या वेळी माझ्याकडून ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूवर मात करण्यासाठी प्रयत्न झाले. त्या दौर्यानंतर मी मंगळुरू सेवाकेंद्रात आल्यावर सहजतेने क्षमायाचना करू शकलो. मी ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूवर चांगल्या प्रकारे मात करू शकलो. माझ्यामध्ये हा पुष्कळ मोठा पालट झाला. त्या वेळी ‘यानंतरही तुम्हाला धर्मप्रचारक संतांच्या समवेत दौर्यावर जायचे आहे,’ असा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी मला आशीर्वाद दिला.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अनुभवत असलेली कृपा
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेमुळे मला पू. रमानंदअण्णांचे मार्गदर्शन सतत लाभत आहे. मला पू. रमानंद अण्णांच्या माध्यमातून त्यांची प्रीती अनुभवता येते. पू. रमानंदअण्णा माझ्यावर करत असलेल्या प्रीतीमुळे मला मायेतील गोष्टी गौण वाटतात. मी पू. रमानंदअण्णांच्या समवेत असतांना सर्वकाही विसरून जातो. त्यांच्या सहवासात असतांना माझी बुद्धी काम करत नाही. माझ्या मनात ‘त्यांचे आज्ञापालन करणे’, हाच विचार असतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी मला ‘तुम्हाला लवकर पू. रमानंद अण्णांप्रमाणे बनायचे आहे’, असा आशीर्वाद दिला आहे.’
– डॉ. प्रणव मल्ल्या, कर्नाटक (२६.६.२०२४)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |