भारतातील कोट्यधीश मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचा नुकताच पार पडलेला भव्य दिव्य विवाह सोहळा संपूर्ण विश्वभरात चांगलाच गाजला. धनाढ्य अनंत यांचा विवाह दैदिप्यमान, तसेच श्रीमंतीचे प्रदर्शन करणारा होणार, हे अभिप्रेत होतेच ! असे असले, तरी हा विवाहसोहळा जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण ठरला, ते म्हणजे अंबानी कुटुंबियांनी हिंदु धर्म, संस्कृती आणि परंपरा यांच्या केलेल्या प्रदर्शनामुळे ! त्यातून विवाहाला एकप्रकारे हिंदुत्वाची झालर प्राप्त झाली होती. सर्वसाधारणपणे गडगंज श्रीमंती असणार्यांच्या विवाह सोहळ्यात पाश्चात्त्य विकृतीचे उदात्तीकरण केले जाते. त्यांच्याप्रमाणेच वेशभूषा केली जाते. आपला धर्म आणि संस्कृती बासनात गुंडाळून ठेवली जाते; पण अंबानींच्या विवाह सोहळ्यात प्रत्येकाने पारंपरिक आणि हिंदु धर्माला साजेसा पोषाख परिधान केला होता. त्यात अश्लीलता किंवा ओंगळवाणेपणा नव्हता. भारतीय संस्कृतीनुसार परिधान केलेल्या वेशभूषेत खरे सौंदर्य, शालीनता, सुंदरता आणि सात्त्विकता होती.
मुकेश आणि नीता अंबानी यांनी ‘विवाह सोहळा सनातन धर्मानुसार साजरा करण्याचे महत्त्व’, ‘विवाह हे पवित्र वचन कसे ?’, ‘कन्येचे लक्ष्मी म्हणून असलेले महत्त्व’, तसेच ‘समाज, कर्तव्य आणि अध्यात्म यांना जोडणारा विवाह सोहळा’, ‘कौटुंबिक, तसेच सांस्कृतिक वारसा म्हणजे काय ?’, यांविषयी उपस्थित पाहुण्यांना अवगत केले. यातून त्यांनी हिंदु (सनातन) धर्माचे महत्त्व सांगितले. ‘हिंदु धर्म, म्हणजेच सनातन धर्म हा नित्यनूतन आहे’, असेही नीता अंबानी म्हणाल्या. मुकेश अंबानी यांनी नवदांपत्याला आशीर्वाद देण्यासाठी निसर्गातील पंचतत्त्वांना आवाहन केले, तसेच त्यांचे वैवाहिक जीवन सुंदर, आनंदी, सुरळीत अन् सुसंस्कृत होण्यासाठीही प्रार्थना केली. हेच तर खरे विवाहातील सौंदर्य आहे. केवळ चेहर्याची रंगरंगोटी केली, उंची वस्त्रे परिधान केली, म्हणजे सुंदरता नव्हे. ती मनाच्या विचारांमध्ये असावी लागते. अंबानी कुटुंबियांमध्ये असलेला धर्माप्रतीचा आदर या विवाहसोहळ्याद्वारे जगासमोर आला.
खरेतर अंबानीही धर्म-संस्कृतीला डावलून विवाह साजरा करू शकले असते; पण त्यांनी तसे न करता शंकराचार्य, हिंदु संत आणि विविध धर्मगुरु यांना आमंत्रित करून विवाह संस्काराला श्रेष्ठतम महत्त्व दिले. धर्म-संस्कृती यांच्या बळावर विवाह समारंभाचे आयोजन करून विवाह म्हणजे मौजमजा, नाचगाणे, खानपान असा संकुचित दृष्टीकोन असणार्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. धर्मनिरपेक्ष असणार्या भारतात हे निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून धर्म आणि संस्कृती यांचा अजोड संगम पहायला मिळाला. प्रत्येकच भारतियाने याचे अनुकरण करून हिंदु संस्कृतीचा अभिमान आपल्या कृतींतून वृद्धींगत करावा ही अपेक्षा !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.