नवी मुंबईत झाडांवर खिळे ठोकून मोठ्या प्रमाणावर विज्ञापने; उद्यान विभागाकडून दुर्लक्ष !

श्री. विजय भोर, नवी मुंबई

झाडांवर दिव्यांच्या माळा सोडून केलेली रोषणाई

नवी मुंबई, ९ ऑगस्ट – नवी मुंबईत झाडांवर खिळे ठोकून मोठ्या प्रमाणावर विज्ञापने लावलेली आढळत आहेत. यासंदर्भात उद्यान विभागाच्या वारंवार निदर्शनास आणूनही संबंधित विज्ञापनदात्यांवर विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने या विज्ञापनदात्यांचे चांगलेच फावले आहे. झाडांवर खिळे ठोकून विज्ञापन करणे किंवा विद्युत् रोषणाई करणे हे पर्यावरण अधिनियमानुसार अनधिकृत आहे. यासंदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने मे महिन्यामध्ये जाहीर आवाहनही प्रसिद्ध करण्यात आले होते. यामध्ये ‘झाडांवर विज्ञापने किंवा विद्युत् रोषणाई केल्यास संबंधितांवर पर्यावरण अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, असेही म्हटले होते. असे असतांनाही ३ महिन्यांपासून यासंदर्भात उद्यान विभागाकडून विशेष म्हणावी तशी कार्यवाही करण्यात आलेली नाही.

शहरांमधील अनेक दुभाजकांमध्ये असलेल्या झाडांवर खिळे ठोकून विज्ञापने लावण्यात आली आहेत. ही विविध छोट्या खासगी आस्थापनांची विज्ञापने आहेत, तसेच शहरातील विविध प्रकारच्या दुकानदारांनी त्यांचे दुकान ग्राहकांच्या त्वरित नजरेस पडावे आणि आकर्षक दिसावे यासाठी दुकानासमोरील झाडांवर विद्युत् रोषणाई केली आहे. यामध्ये उपाहारगृहांचा अधिक समावेश आहे.

काही उपाहारगृह चालकांनी जवळील झाडांमध्ये दिव्यांच्या माळा सोडल्या आहेत. या सर्वांनी महापालिकेच्या या सूचनेला केराची टोपली दाखवत मोठ्या प्रमाणात झाडांवर विद्युत् रोषणाई केली आहे. या संदर्भातही संबंधित विभागाच्या निदर्शनास आणल्यावर काही प्रकरणात कार्यवाही केली जाते; मात्र काही दिवसांत पुन्हा तेथे विद्युत् रोषणाई केली जाते. नंतर याकडे लक्ष दिले जात नसल्याने उपाहारगृह, तसेच अन्य दुकानदारांचे चांगलेच फावले आहे.

या प्रकरणी आलेल्या तक्रारींची नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर यांनी दिली.