S Jaishankar : बांगलादेशातील परिस्‍थितीवर लक्ष ठेवून आहोत ! – परराष्‍ट्रमंत्री एस्. जयशंकर

  • सर्वपक्षीय बैठकीत परराष्‍ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी दिली माहिती

  • शेख हसीना यांनी भविष्‍याविषयी काहीही सांगितले नसल्‍याचे केले स्‍पष्‍ट

सर्वपक्षीय बैठक

नवी देहली – बांगलादेशातील परिस्‍थिती लक्षात घेऊन आम्‍ही त्‍यावर लक्ष ठेवून आहोत, आम्‍ही शेख हसीना यांच्‍याविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी दिली. बांगलादेशातील अस्‍थिरतेेच्‍या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने ६ ऑगस्‍टला सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्‍या वेळी त्‍यांनी ही माहिती दिली. ‘बांगलादेशमध्‍ये १२-१३ सहस्र भारतीय आहेत. या भारतीय विद्यार्थ्‍यांना आताच विमानांद्वारे भारतात आणण्‍याची आवश्‍यकता नाही’ असेही त्‍यांनी या वेळी स्‍पष्‍ट केले. या बैठकीच्‍या अध्‍यक्षस्‍थानी पंतप्रधान मोदी होते. या बैठकीत भाजप, काँग्रेस, जनता दल (संयुक्‍त), समाजवादी पक्ष, द्रमुक, राष्‍ट्रीय जनता दल आदी पक्षाचे नेते उपस्‍थित होते.

डॉ. एस्. जयशंकर यांनी पुढे माहिती देतांना सांगितले की, शेख हसीना यांना भारतात रहायचे आहे कि इतर कोणत्‍या देशात त्‍या आश्रय घेणार ? याविषयी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. माझे शेख हसीना यांच्‍याशी बोलणे झाले आहे. त्‍यांनी त्‍यांच्‍या भविष्‍यातील योजनांवर काहीही सांगितले नाही.