मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ (एक वृक्ष आईच्या नावावर) या संकल्पनेच्या धर्तीवर राज्यात ‘अमृतवृक्ष आपल्या दारी’ या संकल्पनेवर राज्य सरकारच्या वनविभागाद्वारे काम चालू झाले आहे. राज्यातील वृक्षलागवड आणि जोपासना यांना प्रोत्साहन देण्याची ही संकल्पना ‘अमृतवृक्ष’ ‘ॲप’च्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत जावी, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते ‘अमृतवृक्ष’ या ॲपचे अनावरण करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. ॲपची निर्मिती ही अतिशय चांगली संकल्पना आहे. हे ‘ॲप’ वापरण्यास सुलभ आणि तांत्रिक अडथळा रहित असले पाहिजे. त्याच्या माध्यमातून नागरिकांनी केलेल्या वृक्ष लागवडीची माहिती मिळण्यासह नागरिकांना वनसंवर्धनाच्या अनुषंगाने विविध माहिती उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी केली.
या वेळी राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीमती शोमिता विश्वास म्हणाल्या की, या योजनेंतर्गत ३० सप्टेंबरपर्यंत वनमहोत्सव आयोजित करून सवलतीच्या दरात नागरिकांना रोपांची विक्री केली जाणार आहे. याशिवाय शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांनाही वृक्षरोपण उपक्रमासाठी वनमहोत्सवातून विनामूल्य रोपे देण्यात येणार आहेत. लागवड केलेल्या वृक्षांची माहिती या ‘ॲप’मध्ये भरावी लागणार आहेत. सलग तीन वर्षे वृक्षांच्या जोपासनेची माहिती संकलित केली जाणार आहे. त्यासाठी संबंधितांनी वृक्षलागवड करतांनाचे छायाचित्र या ॲपमध्ये जोडावे (अपलोड) लागणार आहे. ठराविक काळानंतर वृक्षाच्या वाढीसह जोपासना करतांनाचे छायाचित्रही जोडावे (अपलोड) लागणार आहे.