मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !
मुंबई – सामूहिक बलात्कार प्रकरणात स्वतः बलात्कार न करता इतरांना त्यासाठी साहाय्य करणार्यालाही बलात्कारासाठी दोषी मानले जाईल, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे. ‘समान हेतूचे पुरावेही शिक्षेसाठी पुरेसे आहेत’, असे न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने सामूहिक बलात्काराच्या प्रकरणी दोषी ठरलेल्या चौघांनी प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना ही माहिती दिली. चंद्रपूर सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला आव्हान देणार्या चारही दोषींच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.
१. १४ जून २०१५ या दिवशी एका मुलीवर संदीप तलांडे, कुणाल घोडाम, शुभम घोडाम आणि अशोक कन्नाके यांनी बलात्कार केला होता. चंद्रपूर सत्र न्यायालयाने २० ऑगस्ट २०१८ या दिवशी चारही आरोपींना २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
२. केवळ २ आरोपींनीच महिलेवर बलात्कार केला; परंतु इतर २ आरोपींच्या समान हेतूने त्यांनाही न्यायालयाने तितकेच दोषी ठरवले.