पॅरिस (फ्रान्स) – भारताच्या प्रसिद्ध नेमबाज मनु भाकर यांनी पॅरिस ऑलिंपिकमध्ये इतिहास रचला आहे. एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकणार्या भाकर या देशातील पहिल्या क्रीडापटू ठरल्या आहेत. त्यांनी महिलांच्या वैयक्तिक १० मी. एअर रायफलच्या अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकले होते. आता त्यांनी सरबज्योत सिंह यांच्यासमवेत मिश्र सांघिक १० मी. एअर रायफलच्या अंतिम फेरीत आणखी एक कांस्यपदक मिळवून देऊन इतिहास रचला. मनू भाकर यांच्याआधी नॉर्मन प्रिचर्डने वर्ष १९०० मध्ये ऍथलेटिक्समध्ये दोन रौप्य पदके जिंकली होती. तेव्हा भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता.
काही भारतीय खेळाडूंनी त्यांच्या कारकीर्दीत ऑलिंपिक स्पर्धेत एकूण दोन पदके जिंकली आहेत. यामध्ये सुशील कुमार (कुस्ती) आणि पी.व्ही. सिंधू (बॅडमिंटन) यांचा समावेश आहे. लंडन २०१२ ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकण्यापूर्वी सुशील यांनी बीजिंग २००८ ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. बॅडमिंटनपटू सिंधू यांनी रिओ २०१६ ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकले. त्यानंतर टोकियोत झालेल्या वर्ष २०२० च्या ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.