परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी चीनला सुनावले !
टोकियो (जपान) – आमचे चीनसमवेतचे संबंध फारसे चांगले नाहीत. वर्ष २०२० मध्ये कोरोना महामारीच्या काळात चीन-भारत सीमेवर सैन्याची तैनाती हे त्याचे कारण आहे. चीनने सीमेवर सैन्य तैनात करून कराराचे उल्लंघन केले आहे. या समस्येचे अद्याप निराकरण झालेले नाही. एक शेजारी म्हणून आम्ही चीनशी चांगले संबंध ठेवण्याची आशा करतो. त्याने प्रत्यक्ष नियंत्रणरेषेचा आदर केला, तरच हे घडू शकते. त्याने यापूर्वी स्वाक्षरी केलेल्या करारांचा आदर करावा. जोपर्यंत त्याचा दृष्टीकोन पालटत नाही, तोपर्यंत भारताशी संबंध सुधारणार नाहीत, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे चीनला सुनावले. येथे ‘क्वाड’ देशांची (भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया) बैठक झाली. या बैठकीपूर्वी डॉ. एस्. जयशंकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात २५ जुलै या दिवशी थायलंडच्या शेजारी असणार्या लाओस देशामध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये भारत-चीन सीमा वादावर नेत्यांमध्ये चर्चा झाली. डॉ. जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांना प्रत्यक्ष नियंत्रणरेषेचा आणि पूर्वीच्या करारांचा आदर करण्यास सांगितले. डॉ. जयशंकर वांग यी यांना म्हणाले होते की, संबंध स्थिर होणे दोन्ही देशांच्या हिताचे आहे. भारत-चीन संबंध पूर्ववत् होण्यामागे सीमावाद हे प्रमुख कारण आहे. सीमेवर जी परिस्थिती असेल, तीच परिस्थिती आमच्या संबंधांमध्येही दिसून येईल.