मुंबईत ‘स्वाईन फ्लू’चा विळखा !
मुंबई – पावसाळ्यात डेंग्यू आणि हिवताप यांसमवेत ‘स्वाईन फ्लू’च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. खासगी रुग्णालयांत प्रतिदिन २० ते २५ ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण आढळून येत आहेत. मुंबई महानगरपालिका पावसाळी आजारांना प्रतिबंध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
प्रशासनाला न जुमानता चालकाने ट्रक पाण्यात घातला !
वर्धा – येथे मुसळधार पावसामुळे वाघाडी नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले. तेथे वाहतूक न करण्याची चेतावणी प्रशासनाने देऊनही चालकाने ट्रक पाण्यात घातला. पाण्याचा वेग प्रचंड असल्याने ट्रक नदीत गेला. चालकासह अन्य दोघे कसेबसे गाडीतून निघून झाडाला लटकले. बचाव पथकाने त्यांना सुखरूप बाहेर काढले.
अमरावती येथे मुलीची आत्महत्या !
अमरावती – येथे १७ वर्षीय मुलीने ११ मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. तिने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ‘पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्याने मी स्वतःला संपवत आहे’, असे संगितले होते.
येवला नगरपालिकेतील लाचखोर कंत्राटी कर्मचारी अटकेत !
अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करायला हवी !
नाशिक – पडीक जागेची तात्पुरती बिनशेती अनुमती मिळवून देण्यासाठी २० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना येवला नगरपालिकेच्या नगरविकास विभागातील कंत्राटी कर्मचारी आकाश गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले.
वाशी येथे धडकेत रिक्शाचालकाचा मृत्यू
नवी मुंबई – वाशी सेक्टर ९ मध्ये ‘हिट अँड रन’ची घटना घडली आहे. एका चारचाकी चालकाने दोन चारचाकी आणि एक रिक्शा यांना जोरदार धडक देऊन पळ काढला. या भीषण अपघातात रिक्शालकाचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाली आहे. चारचाकी पोलिसांच्या कह्यात आहे.
शहरात अतीवृष्टी आणि पूरपरिस्थितीचा वीजयंत्रणेला फटका !
पिंपरी (जिल्हा पुणे) – शहरात अतीवृष्टी आणि पूरपरिस्थितीचा वीजयंत्रणेला फटका बसला आहे. वीजयंत्रणा आणि अनेक सोसायट्यांमधील ‘मीटरबॉक्स’ पाण्यात असल्याने विद्युत् अपघात टाळण्यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून शहरातील ५५ रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. अतीवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे वीजयंत्रणा नादुरुस्त झाल्याने विविध भागांतील ८४ सहस्र ६०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजयंत्रणेत बिघाड झाल्याने महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत.