कॅनडामध्ये सर्वाधिक १७२ विद्यार्थ्यांचा मृत्यू
नवी देहली – गेल्या ५ वर्षांत जगातील ४१ देशांत ६३३ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी कॅनडामध्ये सर्वाधिक १७२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर अमेरिकेत १०८, ब्रिटनमध्ये ५८, ऑस्ट्रेलियात, ५७, रशियात ३७ आणि जर्मनीत २४ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. याखेरीज पाकिस्तानमध्येही एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली. केरळचे खासदार कोडिकुन्निल सुरेश यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.
मृत्यू झालेल्या एकूण ६३३ विद्यार्थ्यांपैकी १९ विद्यार्थ्यांचा मृत्यू हिंसक घटनांमध्ये झाला आहे. यांपैकी कॅनडात सर्वाधिक ९, त्यानंतर अमेरिकेत ६, तसेच ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, चीन आणि किर्गिस्तान या देशांमध्ये प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा मृत्यू हिंसक घटनांमुळे झाल्याचे सरकारने सांगितले.
परदेशात सध्या शिक्षण घेणार्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या !
भारत सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार वर्ष २०२४ मध्ये परदेशातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या १३ लाख ३५ सहस्र इतकी आहे. यांमध्ये सर्वाधिक ४ लाख २७ सहस्र विद्यार्थी कॅनडामध्ये शिक्षण घेत आहेत, तर अमेरिकेत ३ लाख ३७ सहस्र, ब्रिटनमध्ये १ लाख ८५ सहस्र, ऑस्ट्रेलियात १ लाख २२ सहस्र, जर्मनीत ४३ सहस्र, संयुक्त अरब अमिरातमध्ये २५ सहस्र, तर रशियात २४ सहस्र ९४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.