‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील काही महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर विनामूल्य मिळणार !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई –  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील लाभार्थ्यांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर विनामूल्य देण्यात येणार आहेत. ही ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ आहे.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील पात्र ५२ लाख १६ सहस्र ४१२ लाभार्थी कुटुंबांना ३०० रुपये अनुदानाप्रमाणे ३ सिलिंडरचे ५३० रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर मांडण्यात आला होता; मात्र केंद्राची योजना राबवल्यास त्याचा महायुती सरकारला लाभ मिळणार नाही. त्यामुळे ही राज्याची स्वतंत्र योजना म्हणून राबवण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळासमोर मांडली.

अशा योजना लागू केल्यामुळे सरकारवरील आर्थिक भारावर मोठा परिणाम होईल, अशी भूमिका नियोजन आणि वित्त विभागाने घेतली. त्यामुळे अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय निघू शकलेला नव्हता. अखेर या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील कुटुंबांना या योजनेचा लाभ देतांना एका कुटुंबात एका शिधापत्रिकेवर कितीही महिलांची नोंद असली, तरी एकच विनामूल्य सिलिंडर दिला जाईल. गॅसजोडणी महिलांच्या नावे असली, तरच हा लाभ मिळेल.

अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार असला, तरी दीड कोटी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळेल. सरकारवर वार्षिक चार ते साडेचार सहस्र कोटींचा बोजा पडण्याची शक्यता आहे.