गृहमंत्र्यांनी बंगाल सरकारवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

लोकसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये झालेला हिंसाचार !

लोकसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये सतत हिंसाचार चालू आहे, ही गंभीर वस्तूस्थिती आहे. यामध्ये निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक यांना सतत लक्ष्य केले जात आहे, त्यांच्यावर आक्रमणे केली जात आहेत किंवा त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. जे मृत आहेत, त्यांचे कुटुंबीय भीतीपोटी शांतपणे शोक करत आहेत आणि जे घायाळ झाले आहेत, त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्यात साम्यवाद्यांचे सरकार असल्यापासून बंगालमध्ये असा हिंसाचार चालू आहे. साम्यवाद्यांचे सरकार असतांना काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांचे कार्यकर्ते हिंसाचारात मारले जात होते; परंतु आता राजकीय विरोधकांच्या विरुद्ध हिंसाचार करण्यात तृणमूल काँग्रेसने साम्यवाद्यांनाही मागे टाकले आहे.

१. भाजप नेत्यांकडून कार्यकर्त्यांना पाठिंबा मिळणे महत्त्वाचे !

तृणमूल काँग्रेसच्या हिंसाचारापासून भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थक यांचे रक्षण करून बंगाल सरकारला यासाठी उत्तरदायी ठरवण्यामध्ये भाजपने म्हणावा तितका पुढाकार न घेणे, हे आश्चर्यजनक आहे. एवढ्या व्यापक प्रमाणात क्रौर्य दिसत असूनही केंद्रातील आणि राज्यातील नेते याविषयी केवळ सामाजिक माध्यमांतून निषेध व्यक्त करत आहेत, असे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. भाजपच्या काही नेत्यांनीच विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील त्रासलेल्या कार्यकर्त्यांना सक्रीयपणे पाठिंबा दिला आहे.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

२. तृणमूल काँग्रेसच्या हिंसाचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी कायदेशीर उपाययोजना परिणामकारक हवी !

तृणमूल काँग्रेसच्या या रानटीपणाला उत्तर देण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी खटले प्रविष्ट (दाखल) करणे, ‘राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि न्यायालये यांनी याविषयी हस्तक्षेप करावा’, अशा याचिका प्रविष्ट करणे वगैरे कायदेशीर मार्ग अवलंबण्यावर भर दिला आहे; परंतु कायद्याचा हा मार्ग पुष्कळ लांब, खर्चिक आणि नेहमीच परिणामकारक असत नाही; कारण राष्ट्रीय मानवाधिकार आयोग हे राज्य सरकारवर थेट कारवाई करू शकत नाही. त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या सरकारवर कारवाई करण्यासाठी परिणामकारक उपाययोजना हवी.

३. तृणमूल काँग्रेसच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी

भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसच्या विरोधात कठोर पवित्रा घेण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारवर कठोर कारवाई होत नसल्याने अनुभवी लोक आणि समर्थक यांचे मनोधैर्य खालावले आहे, असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. निवडणुकीच्या काळात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या अरेरावीला तोंड देण्यासाठी प्रत्यक्षात समाजात जाऊन कार्य करणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्यांना पाठींबा न मिळाल्याने त्यांचे मनोधैर्य खालावले आणि भाजपच्या कामगिरीवर परिणाम झाला, असेही या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

४. तृणमूल काँग्रेसच्या विरोधात करण्यास शक्य असलेली उपाययोजना

‘जर भाजपच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात अशाच प्रकारे हिंसाचार चालू राहिला, तर त्याला प्रतिसाद देतांना कठोर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री अन् तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना द्यावी’, असे भाजपच्या काही नेत्यांनी सुचवले आहे. राज्यघटनेच्या कलम ३५५ नुसार केंद्र सरकार बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था स्वतःच्या कह्यात घेऊ शकते. सध्या अशी चेतावणी दिल्यानंतर त्याचा परिणाम होऊन हिंसाचारावर अकुंश लागेल, असे या नेत्यांचे म्हणणे आहे. अशा निर्णायक कृतीविना बंगालमध्ये हिंदूंना चांगले दिवस येण्याची शक्यता धूसर आहे.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.