ताम्हिणी घाटातही दरड रस्त्यावर !
पुणे – पुणे जिल्ह्यात ३२ वर्षांमध्ये झालेल्या या सर्वांत मुसळधार पावसामुळे मुळशी तालुक्यातील सुप्रसिद्ध लवासा प्रकल्पात दरड कोसळून २ बंगले भूमीखाली गाडले गेले आहेत. या बंगल्यात ३ ते ४ जण रहात होते, ते बेपत्ता झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. बेपत्ता नागरिकांचा स्थानिकांच्या साहाय्याने शोध घेतला जात आहे. मुळशी तालुक्यातील लवासा येथे ४५३.५ मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे डोंगररांगातून वहाणार्या पावसाच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली; पण बचाव पथकाला घटनास्थळी पोचण्यास विलंब झाला. मुळशी तालुक्यात सर्वत्र पाऊस चालू असल्यामुळे बचाव पथक अडकून पडल्याची माहिती आहे. ताम्हिणी घाटातही दरड कोसळली असल्याची माहिती आहे.
पुणे येथे ४ जणांचा मृत्यू
पुणे येथे अंडा भुर्जीचा स्टॉल सुरक्षित ठिकाणी नेत असतांना विजेचा धक्का लागून ३ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर ताम्हिणी घाट विभागात दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.
१६० नागरिकांची सुखरूप सुटका !
आतापर्यंत पुणे अग्नीशमनदलाने पावसात अडकलेल्या जवळपास १६० नागरिकांची सुखरूप सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. यासाठी त्यांनी बोटी, रस्सी, ‘लाईफ जॅकेट’, ‘लाईफ रिंग’ असे विविध साहित्य वापरले. स्वत: मुख्य अग्नीशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, तसेच २० अग्नीशमन अधिकारी, २०० कर्मचारी कार्यरत आहेत.