Taj Mahal Petition : ताजमहालामध्‍ये दुग्‍धाभिषेक आणि जलाभिषेक करण्‍याच्‍या मागणीसाठी न्‍यायालयात याचिका !

ताजमहाल

आगरा (उत्तरप्रदेश) – येथील ताजमहालमध्‍ये श्रावण मासामध्‍ये दुग्‍धाभिषेक आणि जलाभिषेक करण्‍याची मागणी योगी युवा ब्रिगेडचे प्रदेशाध्‍यक्ष आणि याचिकाकर्ते कुंवर अजय तोमर यांनी केली आहे. यासाठी त्‍यांनी स्‍कॉल कॉज न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली आहे. यामध्‍ये ‘पुरातत्‍व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षकांना प्रतिवादी करण्‍यात आले आहे. या याचिकेवर १६ ऑगस्‍ट या दिवशी सुनावणी होणार आहे. याआधी २६ एप्रिल २०२४ या दिवशी यासंदर्भात याचिका प्रविष्‍ट (दाखल) करण्‍यात आली होती. न्‍यायालयाने त्‍या वेळी पुरातत्‍व सर्वेक्षण विभागाला नोटीस पाठवली होती; मात्र या विभागाकडून त्‍यावर कोणतेही उत्तर दिले नाही. त्‍यामुळे पुन्‍हा एकदा याचिका प्रविष्‍ट करण्‍यात आली आहे.

कुंवर अजय तोमर यांनी याचिकेत म्‍हटले आहे की, श्रावण महिना कोट्यवधी हिंदूंच्‍या श्रद्धेशी जोडलेला आहे. भगवान शंकराच्‍या उपासनेचा हा सण आहे. तेजोमहालय (ताजमहाल) हे भगवान शिवाचे मंदिर आहे. त्‍यामुळे येथे जलाभिषेक आणि दुधाभिषेक करण्‍यात यावा. वर्ष १२१२ मध्‍ये राजा परमादिदेव याने तेजोमहालय बांधले होते. त्‍यानंतर राजा मानसिंह याने त्‍याला महालाचे स्‍वरूप दिले. त्‍या वेळी मंदिर सुरक्षित ठेवण्‍यात आले होते. पुढे मोगलांची सत्ता आली. त्‍या काळात शाहजहान याने राजा मानसिंहकडून तेजोमहालय कह्यात घेतले. येथे शाहजहानची पत्नी मुमताज हिची कबर नाही. मुमताजची खरी कबर मध्‍यप्रदेशातील बुरहानपूरमध्‍ये आहे. मुमताजचा मृतदेह तापी नदीच्‍या काठावर पुरण्‍यात आला. याचे पुरावे आजही उपलब्‍ध आहेत. मोगलांनी भारतात येऊन मंदिरे पाडली आणि त्‍यावर थडगी बांधली.

संपादकीय भूमिका

अशी मागणी करण्‍याची वेळ हिंदूंवर येऊ नये, यासाठी सरकारनेच ताजमहालच्‍या उत्‍खननाचा आदेश देऊन सत्‍य समोर आणणे आवश्‍यक !