बेंगळुरू (कर्नाटक) येथील श्रीमती पूर्णिमा प्रभु यांनी त्यांच्या साधनेला केलेला आरंभ आणि केलेल्या सेवा यांविषयी त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा यांविषयी जाणून घेत आहोत. यातील काही भाग आपण २२ जुलै या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहूया.
(भाग ३)
या लेखाचा मागील भाग वाचण्याकरिता येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/816512.html
११. ‘सनातन पंचांगां’च्या छपाईसाठी योग्य मुद्रणालय मिळणे
वर्ष २००६ -२००७ मध्ये मराठी भाषेतील ‘सनातन पंचांग’ बेंगळुरूलाच छापूया’, असे ठरले. आम्हाला मुद्रणालय शोधण्यास सांगण्यात आले. आम्ही पुष्कळ मुद्रणालयांमध्ये गेलो. कुणाकडेच चांगली यंत्रसामुग्री नव्हती. त्यांच्याकडच्या मुद्रणाचे मूल्य अधिक होते आणि जागाही लहान होती. शेवटी एका व्यक्तीने ‘गीतांजली प्रिंटर्स’चे मालक श्री. नागसुंदर यांचे नाव सुचवले. त्यांच्याकडे नुकतेच जर्मनीहून आणलेले आधुनिक यंत्र होते, तसेच त्यांच्याकडे जागाही मोठी होती. आम्ही त्यांच्याकडेच पंचांग छापायचे निश्चित केले.
११ अ. नामजपादी उपाय केल्याने बंद पडलेले छपाईयंत्र चालू होणे आणि त्यानंतर मुद्रणालयाचे मालक श्री. नागसुंदर यांची गुरुदेवांवरील श्रद्धा वाढणे : श्री. नागसुंदर मितभाषी आणि सहकार्य करणारे होते. आम्ही तिथे गेलो की, त्यांना आनंद व्हायचा. एकदा आम्ही मुद्रणालयात गेलो होतो. तेव्हा छपाईयंत्र बंद पडले होते. त्यामुळे श्री. नागसुंदर काळजीत होते. त्यांनी आम्हाला ‘तुम्हीच काहीतरी करा’, असे सांगितले. तेव्हा आम्ही नारळ ठेवला, गणपतीला प्रार्थना केली, ‘ज्योत से ज्योत जगाओ…’, ही आरती म्हटली आणि दत्ताचा नामजप केला अन् काय आश्चर्य ! यंत्र लगेच चालू झाले. नंतर श्री. नागसुंदर यांची गुरुदेवांवरची श्रद्धा वाढली.
११ आ. मुद्रणालयात अध्यात्मप्रसार करणारे आणि गुरुसेवेत सहभागी होणारे श्री. नागसुंदर ! : श्री. नागसुंदर यांनी त्यांच्या मुद्रणालयातील कामगारांसाठी सनातनचे एक प्रवचन ठेवले. कामगार नामजप करत सेवा (काम) करायला लागले. नंतर काही जण रामनाथी आश्रमातही येऊन गेले. पुढे श्री. नागसुंदर स्वतःच ‘सनातन पंचांगा’च्या मुद्रणात लक्ष घालायचे आणि ‘सगळे वेळेवर होत आहे’, असे ते आम्हाला सांगायचे. ते कधी कधी आम्हाला पंचांगांचे ‘पार्सल’ करायला स्वतःचे वाहनही द्यायचे. आता ते सनातनचे साधकच आहेत.
११ इ. श्री. नागसुंदर यांच्या जागेविषयीच्या खटल्यात त्यांच्या बाजूने निकाल लागणे, त्या जागेवर त्यांनी मोठे मुद्रणालय बांधणे आणि पुढे ‘सनातन पंचांग’ अन् इतर ग्रंथ यांचे मुद्रण तेथेच होणे : मध्यंतरी श्री. नागसुंदर यांना मोठी अनुभूती आली. त्यांनी एक जागा घेतली होती आणि त्या जागेविषयी न्यायालयात खटला चालू होता. पुढे श्री. नागसुंदर यांच्या बाजूने निर्णय होऊन त्यांना जागा मिळाली आणि नंतर त्यांनी मोठे मुद्रणालय बांधले. ‘जणूकाही देवानेच ते मुद्रणालय बांधून दिले’, असे मला जाणवले; कारण पुढे ‘सनातन पंचांगा’च्या १० आवृत्त्या, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’, हा ग्रंथ यांचे मुद्रण या मुद्रणालयातच होणार होते.
१२. ‘सनातन पंचांगा’साठी विज्ञापने गोळा करण्याची सेवा करणे
वर्ष २००७ मध्ये कन्नड भाषेतील ‘सनातन पंचांगा’ची सेवा चालू झाली. कन्नड पंचांगासाठी न्यूनतम ५ सहस्र रुपयांची विज्ञापने लागणार होती. ‘ही विज्ञापने कशी मिळवायची ?’, असे विचार आम्हा साधकांच्या मनात येत होते; पण देवाने आम्हाला सेवा करण्यासाठी शक्ती दिली. त्यामुळे सेवा चालू झाली आणि १०० टक्के पूर्णही झाली.
१२ अ. सगळेच विज्ञापनदाते ‘सनातनमय’ होणे : काही प्रतिष्ठित आस्थापने विज्ञापने देतात. त्यांना विज्ञापने छापण्याची आवश्यकता नसते; पण ‘आमचे विज्ञापन बघून बाकी आस्थापनेही तुम्हाला विज्ञापन देतील’, असे म्हणून ते विज्ञापने देतात. काही जण म्हणतात, ‘‘आम्ही विज्ञापन द्यायचे बंद केले आहे; पण तुमच्या पंचांगाला विज्ञापन द्यायला आम्ही ‘नाही’ म्हणू शकत नाही.’’
या सेवेत पुष्कळ विज्ञापनदाते जोडले गेले आहेत. ते आता सेवा जरी करत नसले, तरी नामजप करत आहेत, तसेच सनातनचे ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आणि वह्या घेत आहेत. ते सनातन पंचांगांचे वितरण करत आहेत. थोडक्यात, सगळेच विज्ञापनदाते ‘सनातनमय’ झाले आहेत.
१२ आ. कोरोना महामारीच्या कालावधीत साधनेचे महत्त्व लक्षात आल्यावर विज्ञापनदात्यांची सनातनविषयीची आत्मीयता वाढणे : कोरोना महामारीच्या कालावधीतही गुरुदेवांनी माझ्याकडून विज्ञापनांची सेवा करून घेतली. मी विज्ञापनदात्यांना भ्रमणभाष केल्यावर कुणीही विज्ञापन द्यायला ‘नाही’ म्हणत नव्हते. त्या कालावधीत साधनेचे महत्त्व विज्ञापनदात्यांच्या लक्षात आले. ‘इतकी वर्षे सनातन संस्था सांगत होती, तो आपत्काळ जवळ आला आहे’, हेही त्यांना समजले. त्यामुळे विज्ञापनदात्यांची सनातनविषयीची आत्मीयता आणि जवळीक वाढली आहे.’
– श्रीमती पूर्णिमा प्रभु (वय ६५ वर्षे), बेंगळुरू, कर्नाटक. (२७.६.२०२२) (क्रमशः)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |