कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती

पंचगंगेने ओलांडली इशारा पातळी !

पंचगंगा नदीचे पात्र

कोल्हापूर – जिल्ह्यात सतत ३ दिवस चालू असलेल्या पावसाने पंचगंगा नदीने ३९ फूट ही ‘इशारा पातळी’ ओलांडली असून तिची ४४ फूट या धोका पातळीकडे वाटचाल चालू आहे. जिल्ह्यातील काही मार्ग वाहतुकीसाठी बंद असून एस्.टी.च्या काही फेर्‍याही रहित करण्यात आल्या आहेत. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरण ८३ टक्के एवढे भरले आहे. येत्या १-२ दिवसांत धरण पूर्ण भरेल आणि विसर्ग होईल, अशी स्थिती आहे. प्रशासनाने नदीकाठच्या ज्या गावांमध्ये पूर येतो, अशा गावांमधील नागरिकांच्या स्थलांतराची स्थिरता चालू केली आहे. कोल्हापूर शहरात तावडे हॉटेल परिसरात ८० लोकांना स्थलांतरित करण्यात आले असून सुतारवाडा परिसरातील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील अनेक लहान-मोठी धरणे, पाणीप्रकल्प भरत आले आहेत. इचलकरंजी शहरात जुन्या पुलावर पाणी आल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. संततधार पावसाने रस्त्यांची स्थिती वाईट झाली असून जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. पूरस्थितीमुळे काही रस्ते बंद असल्याने शिवाजी विद्यापिठाच्या २३ आणि २४ जुलैला होणार्‍या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असे पत्रक विद्यापिठाच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आले आहे.