कोल्हापूर – राधानगरी तालुक्यातील वाळवे-बद्रुक येथील संत पू. (ह.भ.प.) धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज (वय ७३ वर्षे) यांचा सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने २१ जुलैला त्यांच्या निवासस्थानी सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सनातन संस्थेचे साधक श्री. चंद्रकांत मोरे आणि सौ. विमल मोरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रीतम पवार, महाराजांच्या भक्त कु. पल्लवी संकपाळ, दैनिक ‘पुण्यनगरी’चे उपसंपादक श्री. युवराज पाटील यांसह महाराजांचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी महाराजांना हार घालून आणि शाल अन् श्रीफळ देऊन सन्मान केला.
जीवन हे अमूल्य असून प्रत्येक क्षण साधनेसाठी उपयोगात आणा ! – पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज
जीवन हे अमूल्य असून प्रत्येक क्षण साधनेसाठी उपयोगात आणला पाहिजे. कोणतीही साधना करतांना ती अंत:करणपूर्वक केली पाहिजे. देवाची ओढ अशी असली पाहिजे की, त्यात आपण सर्वस्व विसरले पाहिजे. ज्ञानप्राप्ती झाल्यावर आपल्याला वैराग्य येते; मात्र ते टिकवता आले पाहिजे, असे अमूल्य मार्गदर्शन या प्रसंगी पू. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी केले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे गुलाबांच्या पाकळ्यांसारखे सुकोमल असलेले चरण नेहमी दिसत असल्याचे पू. रक्ताडे महाराज यांनी सांगणेया वेळी पू. रक्ताडे महाराज यांना ‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी नमस्कार सांगितला असून सनातन संस्थेच्या रामनाथी आश्रमात बोलावले आहे’, असा निरोप श्री. किरण दुसे यांनी दिला. हा निरोप सांगितल्यावर पू. रक्ताडे महाराज म्हणाले, ‘‘सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात गेल्यावर जरी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची भेट होऊ शकली नाही, तरी समाधी अवस्थेत त्यांना मी भेटलो. त्यांचे गुलाबांच्या पाकळ्यांसारखे सुकोमल असलेले चरण मला नेहमी दिसतात.’’ |
पू. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांचा परिचय !
पू. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज हे राधानगरी तालुक्यातील वाळवे बद्रुक येथील आहेत. वर्ष १९८२ मध्ये त्यांनी काडसिद्धेश्वर महाराज यांच्याकडून गुरुमंत्र घेतला, तसेच पंढरपूर येथील नामदेव टेंभूकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ते सांप्रदायिक अनुयायी बनले. त्यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत. या अभंगांचे वैशिष्ट्य म्हणजे हे अभंग सर्वसामान्य मनुष्याला समजतील असे साधे, सोपे आणि भक्तीचा अविट गोडवा असलेले आहेत.
पू. ह.भ.प. धोंडिबा रक्ताडे महाराज यांनी रचलेला अभंग
गाऊ संतांचे गुणगाण ।
गाऊ संतांचे गुणगाण ।
घेऊ भक्तीचे निशाण ॥ १ ॥
नाम महिमा अपार ।
भेटविल तो ईश्वर ॥ २ ॥
अखंड नाम वाचेत ।
विकार होतील नष्ट ॥ ३ ॥
अविकारी मानव देहात ।
निवास असे भगवंत ॥ ४ ॥
होण्यास निज ज्ञानप्राप्ती ।
घ्यावी गुरु शरणांगती ॥ ५ ॥
धोंडिबा म्हणे गुरुकृपेनं ।
प्राप्त होतील नारायण ॥ ६ ॥
– ह.भ.प. धोंडिबा रक्ताडे (महाराज), वाळ (साभार : ग्रंथ ‘धोंडीबाची अभंगवाणी’, खंड – १)