|
फ्नोम पेन्ह (कंबोडिया) – येथे साधारण ६५० हून अधिक भारतियांना ‘सायबर स्लेव्ह’, म्हणजेच गुलाम बनवून त्यांच्याकरवी सायबर गुन्हे करवून घेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या सुटकेसाठी कंबोडियातील भारतीय दूतावासाने प्रयत्न चालू केले आहेत. दूतावासाने म्हटले आहे की, या भारतियांची सुटका करून त्यांना मायदेशी परत पाठवण्याचे आमचे ध्येय असून त्यांच्या सुटकेसाठी आम्ही प्रयत्नत आहोत.
१. हे लोक नोकरीच्या आमिषाला बळी पडून कंबोडियामध्ये आले. या भारतियांची फसगत करून त्यांना येथे सायबर गुन्ह्यात गुंतवण्यात आले आहे.
२. आतापर्यंत १४ भारतीय नागरिकांची सुटका करण्यात यश आले आहे.
३. भारतीय दूतावासाने जाहीर केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, कंबोडियातील कोणत्याही नोकरीच्या प्रस्तावासंदर्भात सावधगिरी बाळगावी, तसेच कसलाही संशय आल्यास आमच्याकडे त्याविषयी तातडीने सूचना द्यावी.
कसा समोर आला घोटाळा ?
केंद्रशासनाच्या एका कर्मचार्याने तक्रार केल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. त्यामुळे हा मोठा घोटाळा उघडकीस आला. या कर्मचार्याने गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला यासंदर्भातील तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. या घोटाळ्यात त्याचे ६७ लाख रुपयांहून अधिक रुपयांची हानी झाली होती. त्यानंतर कंबोडियातून ८ जणांना अटक करण्यात आली.