येमेनमधील हुती बंडखोरांच्या तळांवर हवाई आक्रमण : ३ जण ठार

तेल अविव (इस्रायल) शहरातील आक्रमणाला इस्रायलकडून प्रत्युत्तर !

येमेनी बंडखोरांच्या ताब्यातील बंदर शहर होडेडामध्ये झालेल्या हल्ल्यांनंतर लागलेली आग

अल् हुदायदा (येमेन) – इस्रायलने येमेनमधील हुती बंडखोरांच्या स्थानांवर हवाई आक्रमणे केली. येमेनमधील अल् हुदायदा बंदर आणि ऊर्जा प्रकल्प यांना लक्ष्य करण्यात आले आहे. या आक्रमणानंतर येथे भीषण आग लागली. या आक्रमणात ३ हुती बंडखोर ठार झाले आहेत, तर ८७ जण घायाळ झाले आहेत. हुती बंडखोरांनी १९ जुलैला तेल अविववर केलेल्या आक्रमणाला इस्रायलकडून हे प्रत्युत्तर देण्यात आले. तेल अविववरील आक्रमणात १ जण ठार, तर १० जण घायाळ झाले होते.

येमेनवरील आक्रमणानंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट म्हणाले की, इस्रायली नागरिकांच्या रक्ताची किंमत आहे आणि जर इस्रायलींवर आक्रमण झाले, तर त्याचे परिणाम लेबनॉन आणि गाझा यांसारखेच होतील. या आक्रमणानंतर हुतीचा प्रवक्ता येह्या सारी याने म्हटले की, हुती इस्रायलवर आक्रमण करण्यास मागे-पुढे पहाणार नाहीत. तेल अविव अजूनही सुरक्षित नाही.

हुती बंडखोर कोण आहेत ?

हुती हा येमेनमधील अल्पसंख्याक शिया ‘जैदी’ समुदायाचा सशस्त्र गट आहे. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांच्या कथित भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी या समुदायाने १९९० च्या दशकात या गटाची स्थापना केली होती. त्याचे नाव त्याच्या मोहिमेचा संस्थापक हुसेन अल्-हुती याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. ते स्वतःला ‘अन्सार अल्लाह’ म्हणजेच ‘देवाचे साथीदार’देखील म्हणतात.

संपादकीय भूमिका

भारत इस्रायलकडून अशा प्रकारचे तात्काळ प्रत्युत्तर देण्यास कधी शिकणार ?