नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत !

  • शाळा-महाविद्यालयांना सुटी

  • नागपूर विमानतळाचे प्रवेशद्वार जलमय

  • कचर्‍यासह घाणेरडे पाणी घरात शिरले

रस्त्यावर साचलेले पाणी (डावीकडे) नागरिक घरातून पावसाचे पाणी बाहेर काढताना (उजवीकडे)

नागपूर – गेल्या दोन दिवसांपासून नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे सर्वत्रचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मुसळधार पावसाचा फटका स्थानिक नागरिकांसह शेतकर्‍यांनाही बसला आहे.

जलमय झालेला शाळेचा परिसर

१. गोंदिया जिल्ह्यातील नदी-नाल्यासह धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पुजारीटोला हे धरण सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून ते तुडुंब भरले आहे. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुराच्या पाण्याने चारही बाजूंनी वेढलेली आहे. गुडघाभर पाणी साचून सर्व साहित्याची नासधूस झालेली आहे. पाण्यात भिजून शालेय पोषण आहाराचे साहित्य खराब होण्याची शक्यता आहे.

२. नागपूर येथील सिम्बॉयसिस महाविद्यालयात पाणी शिरले आहे. पावसामुळे येथील शाळा-महाविद्यालयांना सुटी घोषित करण्यात आली.

३. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात मरून नदीला पूर आल्यामुळे नक्षी या गट ग्रामपंचायतीअंतर्गत मांगली गावात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे तेथे येण्याचे सर्व मार्ग बंद झाले. गावचे सरपंच अनिकेत वराडे (वय २८ वर्षे) यांनी स्वत: पुराच्या पाण्यात पोहत मांगली गाव गाठून गावकर्‍यांना दिलासा दिला.

४. नागपूर येथील पिपला फाटा परिसरात नाल्याच्या पाण्याची पातळी वाढून अनेक घरे पाण्यात आहेत. पाण्यापासून वाचण्यासाठी नागरिक छतावर गेले; पण त्यांना सुरक्षित स्थळी हालवण्याविषयी विचारल्यावर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने ‘ही हद्द आमची नाही’, असे सांगत हात वर केले. येथील आदर्श संस्कार शाळेच्या छतावरही काही मुले अडकली होती.

५. नागपूर विमानतळाचे प्रवेशद्वार जलमय झाले असल्याने विमानतळात जाण्याचा आणि तेथून बाहेर पडण्याचा मार्ग पोलिसांनी पूर्णपणे बंद केला आहे.

६. नागपूरच्या भांडेवाडी कचरा डेपोजवळ पावसाच्या पाण्यासह डंपिंग यार्डचा कचराही वाहून आला. त्यामुळे तेथील परिसरातील लोकांच्या वस्तीत अनेकांच्या घरी कचर्‍यासह घाणेरडे पाणी शिरले. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.